पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: August 17, 2014 01:54 IST2014-08-17T01:53:01+5:302014-08-17T01:54:13+5:30

परभणी : जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ काही भागात शेतकऱ्यांनी ठिबकवर कापूस, सोयाबीन जगविला असून, या पिकांनाही तुडतुडे, फुलकिडे व ऊंट आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे़

Pests of insects on crops | पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव

पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव

परभणी : जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ काही भागात शेतकऱ्यांनी ठिबकवर कापूस, सोयाबीन जगविला असून, या पिकांनाही तुडतुडे, फुलकिडे व ऊंट आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे आणखी एक संकट या शेतकऱ्यांवर कोसळले आहे़
यावर्षी शेतकऱ्यांवर संकटाचा मारा सुरू आहे़ जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या दुष्टचक्राचा अजूनही शेवट झालेला नाही़ फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली़ यात संपूर्ण रबी हंगाम धुवून गेला़ रबी हंगामातील काहीही हाताशी न लागल्याने शेतकरी हताश झाला होता़ या संकटातून कसेबसे सावरत खरिपाच्या तयारीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला़ परंतु, निसर्गाने पुन्हा एकदा दगा दिला़
पावसाने पाठ फिरविली असून, अर्धा पावसाळा संपल्यानंतरही वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही़ त्यामुळे दुबार तर काही भागात तिबार पेरणी करावी लागली़ पेरणीवर मोठा खर्च करूनही पिके मात्र जेमतेमच आहेत़ पाऊस नसल्याने अनेक भागात पेरलेले उगवलेच नाही़ अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवर कापूस, सोयाबीन ही पिके जगविली़ परंतु, सध्याच्या स्थितीला कापसावर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा कहर, सोयाबीनवर हिरव्या ऊंट आळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे़ त्यामुळे या प्रादुर्भावापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे़
दरम्यान प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर कशा प्रकारे उपाय योजना करावी, या विषयीचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे़ (प्रतिनिधी)
ऊंट आळीचा प्रादुर्भाव झाल्यास
अल्पसा पाऊस, ढगाळ हवामान ही परिस्थिती ऊंट आळीसाठी पोषक असते़ सोयाबीनवर ऊंट आळीचा प्रादुर्भाव दिसत आहे़ हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक तणमुक्त ठेवावे़ तीन आळ्या प्रतिमीटर ओळीत आढळल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरीया बॅसियाना किंवा बि़टी़ पावडर २० ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली पाण्यात फवारे़, पावर पंपाचा वापर करावयाचा असल्यास किटक नाशकाची मात्रा तीन पट करावी, असे आवाहन किटकशास्त्र विभागाप्रमुख तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ़ बी़ बी़ भोसले यांनी केले आहे़
तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास...
कापूस पिकावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांनी शिफारशीपेक्षा जास्त नत्राचा वापर करू नये, संकरीत वाणाकरीता इमीडॅक्लोप्रिड ७० डब्ल्यू़ एस़ किंवा थायमिथॉक्झॉम ७० डब्ल्यू़ एस़ ५ ते ७ ग्रॅम प्रतिकिलो ग्रॅम बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास ३० ते ६० दिवसांपर्यंत तुडतुड्याच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यास मदत होते़ आर्थिक नुकसानीची पातळी दोन-तीन तुडतुडे प्रति पान तसेच १० फुलकिडे प्रति पान आढळल्यास अ‍ॅसिफेट ७५ एस़पी़ २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ एस़सी़ २० मिली किंवा अ‍ॅसिटामीप्रीड २० एस़ पी़ २ ग्रॅम किंवा थायमोथॅक्झॉम २५ डब्ल्यू़ जी़ ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी़ फवारणी शक्यतो साध्या व ट्रिपल अ‍ॅक्शन नोझलच्या पंपाने करावी़ थेंब तुषारासारखे पडावेत व पानाच्या मागच्या बाजुने व्यवस्थितरित्या फवारणी करावी, असे आवाहन डॉ़ भोसले यांनी केले आहे़

Web Title: Pests of insects on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.