'दानपारमिता' जगणारी व्यक्ती हरपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:05+5:302021-02-05T04:17:05+5:30
औरंगाबाद : माधवराव बोरडे हे धम्म व सामाजिक चळवळीचे पोशिंदे होते. त्यांच्या रूपाने दानपारमिता जगणारी व्यक्ती हरपली, अशा शब्दांत ...

'दानपारमिता' जगणारी व्यक्ती हरपली
औरंगाबाद : माधवराव बोरडे हे धम्म व सामाजिक चळवळीचे पोशिंदे होते. त्यांच्या रूपाने दानपारमिता जगणारी व्यक्ती हरपली, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नंदनवन कॉलनी येथील बुद्ध विहारात, मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र, मजनू हिल येथे व मावसाळा येथील बुद्ध विहारात अलीकडेच बोरडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभांचे आयोजन करण्यात आले होते.
नंदनवन कॉलनी येथील शोकसभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विजय पाथ्रीकर हे होते.
सर्वसाधारण शेतमजुराच्या घरात जन्माला येऊन आणि अनेक हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतलेले माधवराव बोरडे हे दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध व्हावे, हेच त्यांचे मोठेपण होय, असे उद्गार प्रा.डॉ. संजय मून यांनी काढले. माजी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी या सभेचे आयोजन केले होते. प्रा.डॉ. क्षमा खोब्रागडे, प्रा. माणिक सावंत व मुकुंद सोनवणे, आदींनी यावेळी शोकसंवेदना व्यक्त केल्या. माधवराव बोरडे यांच्या पत्नी विठाबाई बोरडे यांची उपस्थिती होती. शेखर मगर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रवीण सूर्यवंशी यांनी आभार मानले.
मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात झालेल्या अभिवादन सभेत प्रतापसिंग बोदडे व नागसेन सावदेकर या ख्यातनाम गायकांनी आपल्या गायनातून बोरडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. ''डंका तुझ्या नावाचा, वाजे दूर दूर माधवा'' हे गीत बोदडे यांनी गायिले. पंडित बोर्डे व सहकाऱ्यांनी ही सभा आयोजित केली होती. प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे हे अध्यक्षस्थानी होते. प्र. ज. निकम गुरुजी, प्राचार्य ग. ह. राठोड, प्रा. भारत शिरसाट, व्ही. के. वाघ, कृष्णा बनकर, राजाभाऊ शिरसाट, बनेखां पठाण, श्रावण गायकवाड, अशोक धनेगावकर, चंद्रभान पारखे, आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
माधवराव बोरडे हे धम्म व सामाजिक चळवळीचे पोशिंदे होते. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. ते विविध चळवळींचा आधारस्तंभ बनले, असे उद्गार डॉ. कांबळे यांनी यावेळी काढले. सचिन निकम यांनी सूत्रसंचालन केले. मुकुल निकाळजे यांनी आभार मानले.