परवानगी तीनची, बांधले सात मजले

By Admin | Updated: December 22, 2015 00:10 IST2015-12-21T23:52:27+5:302015-12-22T00:10:48+5:30

औरंगाबाद : भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने सिडकोत हॉस्पिटलसाठी तीन मजल्यांची बांधकाम परवानगी घेऊन चक्क सात मजल्यांचे टोलेजंग बांधकाम केले

Permitted three, built seven floors | परवानगी तीनची, बांधले सात मजले

परवानगी तीनची, बांधले सात मजले


औरंगाबाद : भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने सिडकोत हॉस्पिटलसाठी तीन मजल्यांची बांधकाम परवानगी घेऊन चक्क सात मजल्यांचे टोलेजंग बांधकाम केले असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. संबंधित संस्थेने भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे. मात्र, परवानगीपेक्षा जास्त बांधकाम असल्यामुळे मनपाने या प्रकरणी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या रेशमा कुरेशी आणि एमआयएमचे सदस्य अब्दुल नाईकवाडी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मनपाने हॉस्पिटलच्या त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे का, त्या इमारतीच्या किती मजल्यांसाठी बांधकाम परवानगी दिलेली आहे, असे प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केले. त्यावर नगररचना सहायक संचालक डी.पी. कुलकर्णी यांनी भगवान प्रसारक मंडळाच्या हॉस्पिटलच्या इमारतीची भोगवटा संचिका मंजूर झालेली नाही, ती शासनाकडे पाठविली आहे, असा खुलासा केला. त्यानंतरही सदस्यांनी जागा किती, किती मजल्यांची परवानगी दिली, असे प्रश्न विचारले. त्याविषयी खुलासा करताना कुलकर्णी म्हणाले की, संस्थेची जागा सुमारे २० हजार स्क्वेअर मीटर असून, त्यावर ७ ते ८ इमारती आहेत.
त्यातील हॉस्पिटलच्या इमारतीसाठी तीन अधिक अर्धी अशी बांधकाम परवानगी दिलेली आहे; पण प्रत्यक्षात सात मजले बांधकाम झाले आहे. संबंधित संस्थेने भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला; परंतु परवाननी आणि प्रत्यक्ष बांधकाम यात फरक आहे, म्हणून आता याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे, असेही ते म्हणाले.
टीडीआर वाटप योग्यच, केवळ नोंदीत चूक...
मनपात काही दिवसांपासून नगररचना विभागाने दिलेल्या बोगस टीडीआरचे प्रकरण चर्चेत आहे. काही सदस्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांकडे त्याची चौकशीही सोपविली आहे. नितीन चित्ते यांनी आजच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला. नारेगाव येथे १२ मीटरऐवजी २४ मीटरचा टीडीआर कसा मंजूर केला, असा सवाल केला. त्यावर चौकशी सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. सभापती थोरात यांनी नगररचनाच्या अधिकाऱ्यांनाही यावर खुलासा करण्याची सूचना केली. नारेगाव येथील प्रकरणात १२ मीटर रस्त्याचाच टीडीआर देण्यात आला आहे. केवळ नोंद करताना २४ मीटर लिहिले गेले, असा खुलासा सहायक संचालक डी.पी. कुलकर्णी यांनी केला.

Web Title: Permitted three, built seven floors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.