बजाजनगरात अटीवर वृक्षतोडीस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 21:37 IST2019-03-02T21:36:45+5:302019-03-02T21:37:02+5:30
बजाजनगरातील जयभवानी चौकात लगत असलेल्या भुखंडावरील ६० झाडे तोडण्यास वन विभागाच्यावतीने पाचपट अधिक झाडे लावण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे.

बजाजनगरात अटीवर वृक्षतोडीस परवानगी
वाळूज महानगर: बजाजनगरातील जयभवानी चौकात लगत असलेल्या भुखंडावरील ६० झाडे तोडण्यास वन विभागाच्यावतीने पाचपट अधिक झाडे लावण्याच्या अटीवर परवानगी दिली आहे. त्यामुळे या भुखंडावरील मोठ-मोठ्या डेरेदार वृक्षाची कटाई सुरु करण्यात आली असून पर्यावरणप्रेमी नागरिकात मात्र नाराजीचा सुर उमटत आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील जयभवानी चौकात असलेला भुखंड काही दिवसापुर्वी डॉ.अमर कोडगिरे यांनी खरेदी केला आहे. हा भुखंड विकसीत करण्यासाठी डॉ.कोडगिरे यांनी भुखंडावरील विविध जातीची झाडे तोडण्याची परवानगी मिळावी, यासाठी वन विभागाच्या दौलताबाद व खुलताबाद विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यामुळे दौलताबाद वनविभागाचे वनपाल यांनी बजाजनगरात भेट देऊन या भुखंडावर निलगिरी ५६, शिरस ३ व शिसु १ अशी ६० झाडे असल्याचा पंचनामा करुन अहवाल खुलताबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या अहवालावरुन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी महाराष्टÑ झाडे तोडण्याचे अधिनियम १९६४चे कलम ३ (अ),३(ब) व सुधारित महाराष्टÑ जमिन सहिता १९६६ मध्ये असलेल्या या तरतुदीनुसार अटी व शर्ती ठेवुन या भुखंडावरील झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे.