‘स्थायी’त विरोधी पक्षनेत्याची ‘दालनघुशी’!

By Admin | Updated: May 24, 2017 00:32 IST2017-05-24T00:31:57+5:302017-05-24T00:32:41+5:30

लातूर : लातूर मनपातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात नूतन विरोधी पक्षनेत्याने घूसखोरी केली

'Permanent' Leader of the Opposition Leader! | ‘स्थायी’त विरोधी पक्षनेत्याची ‘दालनघुशी’!

‘स्थायी’त विरोधी पक्षनेत्याची ‘दालनघुशी’!

लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूर मनपातील स्थायी समिती सभापतींच्या दालनात नूतन विरोधी पक्षनेत्याने घूसखोरी केली असून, जुन्या सभापतींचा कार्यकाळ संपला नसताना नूतन विरोधी पक्षनेत्याचा फलक दालनाबाहेर लागला आहे. यामुळे मनपात खळबळ उडाली असून, स्थायी सभापतींनी चेंबरमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, गोपनीय तसेच न्यायालयीन दस्तावेज ठेवले असल्याचे आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
लातूर मनपाच्या इमारतीतील दालन क्र. ३४ मध्ये स्थायी समितीच्या सभापतींचे चेंबर आहे. जून २०१६ पासून स्थायीचे सभापती म्हणून विक्रांत गोजमगुंडे काम पाहतात. सार्वत्रिक निवडणूक होऊन भाजपाची सत्ता मनपात आली आहे. गेल्या सोमवारीच महापौर व उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्वीकृत सदस्य व स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. ही निवड होताच दुसऱ्या दिवशी मंगळवारी नूतन विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ यांनी स्थायी समितीच्या सभापतींचे चेंबर घेतले. दालनाबाहेर विरोधी पक्षनेत्याचा फलकही लावण्यात आला. विशेष म्हणजे स्थायी समितीच्या नूतन सभापतींची निवड अद्याप झाली नाही. तरीही विरोधी पक्षनेत्यांनी या दालनात घूसखोरी केली आहे. यामुळे मनपात खळबळ उडाली असून, विद्यमान सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी चेंबरमध्ये वैयक्तिक महत्त्वाचे, कार्यालयीन, गोपनीय तसेच न्यायालयीन दस्तावेज ठेवले होते. कार्यकाळ संपला नसल्यामुळे त्यांनी दस्तावेज चेंबरमध्येच ठेवले होते. त्यांनी मंगळवारी मनपातील दालन क्र. ३४ ला भेट दिली असता नामफलक बदलल्याचे दिसून आले. कक्षात प्रवेश करून पाहिले असता दस्तावेज जागेवर दिसून आलेले नाहीत, असे विक्रांत गोजमगुंडे यांनी आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही कागदपत्रे इतर व्यक्तींच्या हाती लागल्यास कार्यालयीन गोपनीयतेचा भंग होऊन माझे वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण चेंबरमध्ये ठेवलेले कागदपत्र उपलब्ध करून द्यावेत तसेच कक्षामध्ये माझ्या वैयक्तिक खर्चातून लावण्यात आलेले तैलचित्रही दिसत नाहीत. तेही उपलब्ध करून द्यावेत, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गोजमगुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे लातूर मनपात खळबळ उडाली आहे. पूर्वीच्या विरोधी पक्षनेत्याचे चेंबर असताना किंवा अन्य सभापतींची दालने रिकामी असताना स्थायीच्याच दालनात विरोधी पक्षनेत्यांचा फलक का लावला, हेच दालन विरोधी पक्षनेत्यांनी का घेतले, असे अनेक प्रश्न मनपा वर्तुळात चर्चिले जात आहेत. नव्या स्थायी समितीत काँग्रेसचे ८ आणि भाजपाचे ८ अशा एकूण १६ सदस्यांची निवड झाली आहे. मात्र अद्याप सभापतींची निवड नाही. त्यामुळे जुन्या सभापतींकडेच पदभार आहे. नव्या सभापतींची निवड झाल्यानंतर हा पदभार दिला जातो असे संकेत आहेत. मात्र विरोधी पक्षनेत्यांनी सभापतींच्या दालनाचा ताबा घेतला, असे फलक पाहून मनपाच्या वर्तुळात चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक मात्र विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या लागलेल्या वादाचा आनंद घेत आहेत.

Web Title: 'Permanent' Leader of the Opposition Leader!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.