सिटीबस खरेदी निविदेला ‘स्थायी’ ची मंजुरी

By Admin | Updated: July 5, 2014 00:40 IST2014-07-05T00:12:35+5:302014-07-05T00:40:16+5:30

लातूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सिटी बस खरेदी खरेदीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे़

Permanent approval for purchase of Citibus purchase | सिटीबस खरेदी निविदेला ‘स्थायी’ ची मंजुरी

सिटीबस खरेदी निविदेला ‘स्थायी’ ची मंजुरी

लातूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत सिटी बस खरेदी खरेदीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे़ त्याचबरोबर राजीव गांधी आवास योजनेंतर्गत कन्सल्टंट नेमण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली़ विशेष म्हणजे, अजेंड्यावर नसलेल्या पाणीटंचाईच्या मुद्यावर विरोधी पक्षातील सदस्यांसह सत्ताधारी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला़ स्थायी समितीच्या नूतन सभापतींची पाहिलीच बैठक असल्याने अनुभवी सदस्यांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला़
मनपातील स्थायी समिती सभापतीच्या दालनात शुक्रवारी झालेल्या सभेत मागील स्थायी समितीच्या सभेचे इतिवृत्त वाचनाला सुरूवात होताच राष्ट्रवादीचे शैलेश स्वामी यांनी शहरात तीव्र पाणीटंचाई असताना पालिका प्रशासन करतेय काय? असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला धारेवर घेतले़ १३ व्या वित्त आयोगातील सर्व निधी पाण्यावर खर्च करावा, दोन दिवसांत महापौरांनी सभा बोलवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे राजा मणियार यांनी दिला़ शहरात सर्वाधिक भेडसावत असलेला पाणीप्रश्न स्थायीच्या सभेत विषयपत्रिकेत घेतला नसल्याची खंत शिवसेनेचे रवी सुडे यांनी व्यक्त केली़ यावर सभापती अख्तर मिस्त्री यांनी महापौरांनी चार दिवसांत सभा न बोलावल्यास स्थायी समितीची सभा बोलावून पाणीटंचाईवर निर्णय घेऊ असे सांगितले़ काही भागात सुरू असलेले टँकर मोठे असल्याने गल्ली-बोळात जाण्यात अडचण होत असल्याने ट्रॅक्टर, छोटे टँकर सुरू करण्याची मागणी काँग्रेसचे असगर पटेल यांनी केली़
अधिकाऱ्यांची गोची़़़
सिटीबस खरेदी निविदा प्रकरणातील कागदपत्रांची मागणी लावून धरलेल्या नगरसेवक शैलेश स्वामी यांनी अधिकारी व विभागप्रमुखांची चांगलीच गोची केली़ नगरअभियंता सल्लाउद्दीन काजी यांना सदरील कागदपत्र सापडत नसल्याने जवळपास अर्धा तास याच विषयावर सभा रेंगाळली़ केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खरेदी प्रक्रिया करावी, अशी मागणी रवी सुडे यांनी केली़
बराच वेळ याच विषयावर सभा रेंगाळत असल्याने स्थायी समितीचे माजी सभापती रामभाऊ कोंबडे यांनी आक्रमकपणे प्रशासनाची बाजू घेत वेळेचे भान असू द्या, असा अट्टाहास धरला़ विशेष म्हणजे वर्षभर सभापती राहिलेले कोंबडे यांनी यापूर्वी सभागृहात कधीच आक्रमकता दाखविली नव्हती़
बैठकीस उपायुक्त जयप्रकाश दांडेगावर, रवीकुमार जाधव, नवनाथ आल्टे, रूपाली सोळुंके, केशरबाई महापुरे, उषा कांबळे, आशाताई स्वामी, पप्पू देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ़ प्रदिप ठेंगळ, ओमप्रकाश मुतंगे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
५ वर्षांसाठी कन्सल्टंट़़़
मनपा कार्यक्षेत्रात मोठ्या किंमतीच्या विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे,इस्टीमेट्स तयार करणे, कामावर प्रकल्पाचे व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहणे यासाठी ५ वर्षांसाठी कन्सल्टंटची नेमणूक करण्यासाठी निविदांना मंजुरी देण्यात आली़ सदर विषयात ३ वर्षांसाठी मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली़ तसेच लहान स्वरूपाच्या कामांसाठी कन्सल्टंटचे पॅनेल नेमणेकामी मागविलेल्या निविदा व राजी गांधी आवास योजनेंतर्गत कन्सल्टंट नेमण्यासाठी स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली़
अपुऱ्या रस्त्यांवर बस धावणार कश़ी़़़?
केंद्र शासनाच्या जे़एऩएऩयु़आऱएम़ योजनेंतर्गत मंजूर ६० बसेस खरेदीकरिता मनपाकडे तीन उत्पादक कंपन्यांच्या थेट निविदा आल्या होत्या़
त्यात अशोक लेलँड कंपनीने ४० स्टँडर्ड नॉन एसी बसेस (प्रति बस ५० लाख ४८ हजार ३७ रूपये), व्होल्वो इं़लि़ कंपनीच्या १० प्रिमियम बसेस (एसी, प्रति बस ९८ लाख ९७ हजार रूपये) व टाटा मोटार्स लि़ कंपनीच्या १० मिनीबसेस (प्रति बस २१ लाख ७ हजार ६६२ रूपये) खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे़ सिटी बस खरेदीसाठी रामभाऊ कोंबडे यांनी ठराव मांडला तर कैलास कांबळे यांनी अनुमोदन दिले़ ६० बसेस खरेदीचा प्रस्ताव असला तरी पहिल्या टप्प्यात ३० बसेस खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़
शहरात रस्ते अपुरे असताना बसेस धावणार कोठून असा प्रश्न उपस्थित करून रिपाइंचे चंद्रकांत चिकटे यांनी आधी अतिक्रमण काढा, मग बसेस सुरू करा, अशी मागणी लावून धरली़ वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढावे लागतेल, अशी मागणी रवि सुडे यांनी केली़

Web Title: Permanent approval for purchase of Citibus purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.