पेन्शनची कागदपत्रे गहाळ, जवाहरनगर पोलिसांची मदत : तासाभरात महिलेला कागदपत्रे सुपूर्द
By राम शिनगारे | Updated: June 5, 2023 21:30 IST2023-06-05T21:30:19+5:302023-06-05T21:30:30+5:30
छत्रपती संभाजीनगर : मृत पतीच्या पेन्शनची कागदपत्रे रिक्षात बसल्यानंतर गहाळ झाली. त्यामुळे डोळ्यांत पाणी घेऊन एका महिलेने मदतीसाठी जवाहरनगर ...

पेन्शनची कागदपत्रे गहाळ, जवाहरनगर पोलिसांची मदत : तासाभरात महिलेला कागदपत्रे सुपूर्द
छत्रपती संभाजीनगर : मृत पतीच्या पेन्शनची कागदपत्रे रिक्षात बसल्यानंतर गहाळ झाली. त्यामुळे डोळ्यांत पाणी घेऊन एका महिलेने मदतीसाठी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. त्याठिकाणी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तासाभरात रिक्षाचालकाचा शोध घेऊन महिलेची पेन्शनसह इतर महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द केली. तासाभरापूर्वी मदतीसाठी आलेली महिला पोलिस ठाण्यातून कागदपत्रे घेऊन हसतमुखाने बाहेर पडली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजली विनायक तांदळे (६२, रा. लक्ष्मीनगर) या सेव्हन हिल येथून महावीर चौकात जाण्यासाठी सायंकाळी एका रिक्षात बसल्या. त्यांच्याकडे दिवंगत पतीच्या पेन्शनची कागदपत्रे, धनादेश पुस्तिकेसह इतर कागदपत्रांची बॅग होती. पण त्या बॅग रिक्षात विसरल्या. अतिशय महत्त्वाची कागदपत्रे असल्यामुळे घाबरलेल्या अंजली तांदळे यांनी तत्काळ जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी घाेरपडे यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घोरपडे यांनी पोलिस अंमलदार धोंडीबा नलावडे यांना सोबत घेत रिक्षाचा शोध घेतला. तासाभरात रिक्षाचालकाचा शोध लागल्यानंतर त्यास कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात बोलावले. तो कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात आला. त्याच्याच हस्ते कागदपत्रे अंजली तांदळे यांच्या सुपूर्द केली. कागदपत्रे मिळाल्यानंतर तांदळे यांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. ही कामगिरी निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.