आडूळजवळ अपघात झालेल्या ट्रकमधून बिअर पळवत तळीराम झाले झिंगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 15:27 IST2018-02-19T14:23:10+5:302018-02-19T15:27:49+5:30
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळनजीक बिअरचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.

आडूळजवळ अपघात झालेल्या ट्रकमधून बिअर पळवत तळीराम झाले झिंगाट
औरंगाबाद : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडूळनजीक बिअरचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या भागातील तळीरामांनी ट्रकमधील बिअरचे बॉक्स पळवले आणि रस्त्यालगतच्या शेतातच बिअर पिऊन झिंगाट झाले.
या बाबत अधिक माहिती अशी कि, आज पहाटे भोपाळहून बिअर घेऊन एक ट्रक केरळला जात होता. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळजवळ पांढरी पिंपळगाव येथे येताच चालकाला डुलकी लागल्याने ट्रक रस्त्यालगत पलटी झाला. यात चालक व क्लीनर दोघे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहिती नुसार ट्रकमध्ये २५ लाखाची बिअर होती.
पहा व्हिडिओ : धुळे- सोलापूर महामार्गावरील बिअरचा ट्रक उलटला, लोकांनी बिअरचे बॉक्स पळविले
'ड्राय डे' च्या दिवशी तळीरामांची झाली पार्टी
बिअरच्या ट्रकला अपघात झाल्याची माहिती आजूबाजूच्या भागात पसरताच अनेक तळीरामांनी अपघातस्थळी मोर्चा वळवला. घटनास्थळी बिअरची बॉक्स ट्रक बाहेर पडल्याचे दिसताच तळीरामांनी ती पळवण्यास सुरुवात केली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस घटनास्थळी आले. यानंतरच बिअर पळविणे बंद झाले. परंतु; पोलीस येईपर्यंत शेकडो बाटल्या लोकांनी पळविल्या होत्या. काहीजण तर पोलिसांच्या धाकाने गुपचूप शेतात लपूनछपून बिअर पिऊन झिंगाट झाले होते. यामुळे आज असलेल्या 'ड्राय डे' च्या दिवशी तळीरामांची चांगलीच पार्टी झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती.