...चक्क चप्पल बुटाच्या दुकानातून पीक जैव उत्प्रेरक औषधांची विक्रीं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 21:29 IST2025-08-14T21:28:24+5:302025-08-14T21:29:45+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे मिळावे,यासाठी कृषी विभागाचे राज्य आणि जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

...चक्क चप्पल बुटाच्या दुकानातून पीक जैव उत्प्रेरक औषधांची विक्रीं
बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर: कृषी विभागाचा ससेमिरा चुकविण्यासाठी चक्क चप्पल - बुटाच्या दुकानातून पीक उत्प्रेरक औषधांची विक्रींचा भंडाफोड कृषीच्या भरारी पथकाच्या धाडीतून समोर आला. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील चप्पल बुटाच्या दुकानातून कृषी अधिकाऱ्यांनी ३लाख ८० हजार रुपयांची औषधींचा साठा पथकाने जप्त केला. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना दर्जेदार खते आणि बियाणे मिळावे,यासाठी कृषी विभागाचे राज्य आणि जिल्हास्तरीय भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील एका चप्पल बुट विक्रीच्या दुकान आणि सायकल मार्टमधून खते आणि जैव उत्पादक कंपनीचा माल विना परवाना विक्री होत असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली.
विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरिभाऊ कातोरे, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, आशिष काळुसे, श्रीकृष्ण बंडगर व तालुका गुणनियंत्रक मनोज सैंदाने यांच्या पथकाने शुक्रवारी नाचनवेल येथील एस.एस.फुटवेअर व व सायकल मार्ट या दुकानावर धाड टाकली. तेव्हा दुकानदार माधव सुसर हे डीएम ऑरगोनेट या जैव उत्पादक कंपनीचा अद्रक व हळद स्पेशल किट आणि मिरची स्पेशल किट विक्री करीत असल्याचे आढळून आले. पथकाने केलेल्या तपासणीत तेथे या जैव उत्प्रेरकांची तब्बल ४३ बॉक्स आढळून आली.
या मालाची किंमत ३लाख ८० हजार ८२५ रुपये आहे. कंपनीमालक ज्ञानेश्वर पवार (रा.सातकुंड,ता. कन्नड) यांच्या मालकीचा हा माल असल्याचे दुकानदाराने पथकाला सांगितले. हा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी तालुका गुणनियंत्रण निरीक्षक मनोज सैंदाने यांच्या तक्रारीवरुन माधव सुसर व ज्ञानेश्वर पवार यांच्याविरोधात पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.