तीन दिवसांत रक्कम भरा अन्यथा गुन्हे दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:44+5:302020-12-30T04:06:44+5:30
कन्नड : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांनी लाभापोटी मिळालेली रक्कम येत्या तीन दिवसांत परत करावी, अन्यथा ...

तीन दिवसांत रक्कम भरा अन्यथा गुन्हे दाखल होणार
कन्नड : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत तालुक्यातील अपात्र लाभार्थ्यांनी लाभापोटी मिळालेली रक्कम येत्या तीन दिवसांत परत करावी, अन्यथा त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
या योजनेंतर्गत ४७ हजार ३६२ लाभार्थी असून त्यांची तपासणी केल्यावर असे लक्षात आले की, पती-पत्नी दोघेही लाभधारक, आयकर दाते, शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा इतर अट पूर्ण न करणारे अपात्र लाभधारक आहेत. यांची संख्या तालुक्यात १ हजार ३९० इतकी निघाली आहे. त्यांनी ९८ लाख रुपयांचा लाभ घेतलेला आहे. या अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्यासाठी त्यांना तलाठ्यांमार्फत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. यातील काही लाभार्थ्यांनी रक्कम जमा केली आहे. मात्र, अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या अपात्र लाभार्थ्यांनी त्यांच्याकडील रक्कम तीन दिवसांत कक्षप्रमुख कुणाल दाभाडे यांच्याकडे जमा करून पावती घ्यावी, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे. तसेच जर ही रक्कम जमा केली नाही तर त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
चौकट
आतापर्यंत २६ लाख रुपयांची वसुली
तालुक्यात शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेतलेल्या १ हजार ३९० लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांकडून प्रशासनाने नोटिसा बजावून २६ लाख रुपयांची रक्कम वसूल केली आहे. ही रक्कम शासनाला परत जाणार आहे. अजूनही अनेकांनी ही रक्कम जमा केलेली नसल्याने प्रशासनाने त्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.