‘ट्राॅमा’तील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:02 IST2021-04-13T04:02:06+5:302021-04-13T04:02:06+5:30
औरंगाबाद : गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर म्हणजे जीव वाचविणारी यंत्रणा ठरते; परंतु व्हेंटिलेटर अचानक बंद पडले तर काय, याचा विचारच ...

‘ट्राॅमा’तील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास
औरंगाबाद : गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर म्हणजे जीव वाचविणारी यंत्रणा ठरते; परंतु व्हेंटिलेटर अचानक बंद पडले तर काय, याचा विचारच न केलेला बरा; परंतु या प्रकाराला सोमवारी भल्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घाटीतील ट्रॉमा केअर युनिटमधील रुग्णांना सामोरे जावे लागले. विद्युत यंत्रणेतील बिघाडाने येथील व्हेंटिलेटरवरील रुग्णांना तब्बल अर्धा तास अंबू बॅगने कृत्रिम श्वास देण्याची वेळ ओढवली. त्यामुळे नातेवाईक, डाॅक्टर, परिचारिकांची धावपळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही गंभीर घटना घडली नाही.
घाटीतील सर्जिकल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ट्राॅमा केअर युनिट आहे. अपघातग्रस्तांसह अन्य अतिगंभीर रुग्णांना अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करण्यासाठी हे युनिट महत्त्वाची भूमिका निभावत आहे. याठिकाणी शनिवारी दुपारपासून वीजपुरवठा विस्कळीत होण्याची समस्या सुरू झाली. त्यामुळे अन्य बाजूच्या इमारतीतून वीजपुरवठा करण्यात आला. या सगळ्यात सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पुन्हा वीज यंत्रणेतील बिघाडाने पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे व्हेंटिलेटर चालत नसल्याची बाब डाॅक्टर, परिचारिकांच्या लक्षात आली. तेव्हा याठिकाणी ६ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या युनिटबाहेरच रुग्णांचे नातेवाईकही बसून असतात. अशी काही अडचण आल्यास आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास लागल्यास अंबू बॅगचा वापर करावा लागतो. त्यामुळे नातेवाईक, डाॅक्टर, परिचारिका, ब्रदर यांनी तात्काळ या रुग्णांना अंबू बॅगने कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. आमच्या रुग्णाला आम्ही आमच्या हाताने अंबू बॅगने कृत्रिम श्वास दिल्याचे एका नातेवाइकाने सांगितले.
भंडारा दुर्घटनेनंतर दुर्लक्ष
भंडारा येथील दुर्घटनेनंतरही घाटीतील जुनाट विद्युत यंत्रणेची ‘अवस्था जैसे थे’च आहे. ट्रामा केअर युनिटमधील घटनेनंतर सोमवारी सकाळी याठिकाणी विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
अन्य इमारतीतून वीजपुरवठा
एक फ्यूज गेला होता. बिघाड शोधण्यात थोडा वेळ गेला; परंतु व्हेंटिलेटरवरील ६ रुग्णांना अंबू बॅग लावण्यात आले होते. अर्ध्या तासात सर्व सुरळीत झाले. कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. ट्राॅमा केअर युनिटला अन्य इमारतीतून वीजपुरवठा करण्यात आला.
- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी
--
फोटो ओळ
ट्राॅमा केअर युनिटमधील विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सोमवारी हाती घेण्यात आले.