दारूविक्रीची तक्रार देणाऱ्यास पोलिसांकडून बेदम मारहाण
By Admin | Updated: July 20, 2015 00:52 IST2015-07-20T00:45:16+5:302015-07-20T00:52:41+5:30
कळंब : ड्राय डे असताना दारु विक्री चालूच असल्याची तक्रार केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यास घरातून उचलून नेवून बेदम मारहाण केल्याची

दारूविक्रीची तक्रार देणाऱ्यास पोलिसांकडून बेदम मारहाण
कळंब : ड्राय डे असताना दारु विक्री चालूच असल्याची तक्रार केल्याच्या कारणावरुन पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यास घरातून उचलून नेवून बेदम मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील कोथळा येथे १८ जुलै रोजी घडली.
कळंब तालुक्यातील कोथळा येथील सामाजिक कार्यकर्ते व दलित चळवळीतील श्रावण भीमराव ओव्हाळ (वय ५०) यांनी १८ जुलै रोजी शिराढोण पोलीस ठाण्याचे सपोनि संभाजी पवार यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कोथळा व परिसरात ड्राय डे असतानाही खुलेआम राजरोसपणे दारुविक्री केली जात असल्याचे सांगितले. ही दारुबंदी करुन संंबंधितांवर कार्यवाही झाली पाहिजे, असा आग्रह ओव्हाळ यांनी सपोनि पवार यांच्याकडे धरला. याचाच राग मनात धरुन शिराढोण पोलीसांनी थेट कोथळा गाठले. या टीममध्ये स्वत: सपोनि पवार, पाच पोलीस कर्मचारी व १ होमगार्ड यांचा समावेश होता. ओव्हाळ यांना घरातून काढून पोलिसांनी पोलीस वाहनात टाकले. हे वाहन गावापासून दीड किलोमिटर बाहेर आल्यानंतर सपोनि पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओव्हाळ यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत पाठीवर, मांडीवर, उजव्या हाताच्या बोटावर व पार्श्वभागावर जबर मारहाण केली.
एवढ्यावरच पोलिसांनी हा कहर थांबविला नाही तर पोलीस ठाण्यात डांबून ‘सुंदरी’ ने ओव्हाळ यांना मारहाण केली. या घटनेनंतर शिराढोण पोलीसात श्रावण ओव्हाळ यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
राज्यात दारुचे बळी जात असताना दारु विक्रीस विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मारहणीचे प्रकार पोलीसांकडून घडत असतील तर याची तुलना निजामशाहीशी करावी लागेल. पोलीसांचा हा उघड अन्याय असून, याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी करण्यात येणार असल्याचे प्रा.डॉ. संजय कांबळे यांनी सांगितले.
कोथळा येथे श्रावण ओव्हाळ हे दारु पिवून गोंधळ करीत असल्याची माहिती हाती आल्यावरुन आम्ही ही कार्यवाही केली. याबाबत ओव्हाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सपोनि संभाजी पवार यांनी सांगितले.