डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड
By Admin | Updated: August 25, 2014 01:36 IST2014-08-25T01:07:03+5:302014-08-25T01:36:45+5:30
कळंब : हजारो रूग्णांचा भार असलेल्या तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी बारा पदे मंजूर असली तरी यातील केवळ सातजण कार्यरत आहेत

डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड
कळंब : हजारो रूग्णांचा भार असलेल्या तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी बारा पदे मंजूर असली तरी यातील केवळ सातजण कार्यरत आहेत. सध्या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत असतानाच अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे उपलब्ध यंत्रणेवर ताण पडत असून, रुग्णांचीही हेळसांड होत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील ईटकूर, मोहा, शिराढोण, दहिफळ, मंगरूळ व येरमाळा या सहा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांवर कळंब शर वगळता इतर ३३ गावांतील हजारो लोकांच्या आरोग्याचा भार आहे. ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय व्यावसायिक कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आरोग्य केंद्रात रूग्णांची संख्य वाढत आहे. यासाठी मुबलक औषधसाठा, सहाय्यक कर्मचारी, भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्या तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मात्र वानवा जाणवत आहे. तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक वैद्यकीय अधिकारी व एक दुय्यम वैद्यकीय अधिकारी याप्रमाणे पदे मंजूर आहेत. परंतु, सद्यस्थितीत बारापैकी सात वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, यातीलही दोघे अकरा महिन्यांच्या कालावधीकरिता कंत्राटी तत्वावर आहेत.
ईटकूर येथील डॉ. सुमित्रा तांबवे याची मंगरूळ येथे बदली झाल्याने चार महिन्यापासून येथील भार डॉ. प्रताप इगे यांच्यावर आहे. शिराढोण येथील डॉ. आनंद कलमे व डॉ. राजर्षी शिंगाडे यांची बदली झाल्याने येथील दोन्ही जागा रिक्त आहेत. येथील कारभार मोहा येथील वैद्यकीय अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे मोहा येथील भार डॉ. पुरूषोत्तम पाटील यांच्यावर असून, तालुका आरोग्य अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभारही डॉ. पाटील हेच सांभाळत आहेत. याशिवाय दहिफळ येथे कार्यरत असलेले दोन्ही वैद्यकीय अधिकारी अकरा महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर कार्यरत असून, मंगरूळ येथील डॉ. सुप्रिया तांबारे या दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी गेल्याने सध्या डॉ. केंद्रे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी तेथील गाडा हाकत आहेत. येरमाळा येथेही डॉ. टेकाळे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, डॉ. धाबेकर हे सोलापूर येथे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. एकूणच वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी उपलब्ध यंत्रणेवर ताण येत आहे. (वार्ताहर)
तालुक्यातील सहा आरोग्य केंद्रातील बाह्यरूग्ण विभागात ११ ते १६ आॅगस्ट या कालावधीत २०७० तर १७ ते २२ आॅगस्ट या कालावधीत १६२२ रूग्णांची नोंद झाली आहे. एकूणच रूग्णांची ही संख्या पाहता सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय व दुय्यम वैद्यकीय अधिकारी कार्यरत राहणे आवश्यक आहे.