खड्डेच झाले गतिरोधक
By Admin | Updated: June 12, 2014 00:20 IST2014-06-12T00:16:49+5:302014-06-12T00:20:55+5:30
नांदेड : वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसविले जातात़ मात्र शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून हे खड्डेच गतिरोधकाचे काम करत असल्याचे दिसून येते़

खड्डेच झाले गतिरोधक
नांदेड : वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसविले जातात़ मात्र शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून हे खड्डेच गतिरोधकाचे काम करत असल्याचे दिसून येते़
नांदेड शहराची लोकसंख्या सहा लाखांपेक्षा अधिक आहे़ जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, बीएसएनएल भवन, जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, सेवायोजन नोंदणी, शिक्षण उपसंचालक कार्यालय, शिकवणी वर्ग यासह श्रीनगर, वजिराबाद, जुना मोंढा, बर्की चौक परिसरात मुख्य बाजारपेठ आहे़ ही सर्व कार्यालये तरोडा नाका ते बर्की चौक या एकाच मार्गावर आहेत़ जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने बाहेरगावाहून विविध कामांसाठी हजारो नागरिक शहरात दाखल होतात़
शहराची लोकसंख्या लक्षात घेता आजघडीला दीड लाख दुचाकी, आरटीओ कार्यालयाच्या नोंदीनुसार दहा हजार आॅटो यासह लहान-मोठी चारचाकी वाहने व सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांचा या रस्त्यावर राबता असतो़ कार्यालयीन वेळेत वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते़ तरोडा नाका ते बर्की चौक हे अंतर जवळपास सहा किलो मीटर आहे़ या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ एखाद्या जागची दुरुस्ती झाली की, लगेचच दुसऱ्या जागी खोदकाम केले जाते़ कोणता रस्ता कधी खोदून ठेवला जाईल, याचा काही नेम राहिला नाही़ पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे बुजवणे, डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे़ किमान पावसाळ्यात तरी खड्डे खोदले जावू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
रस्त्याची पोखरण
एका खाजगी कंपनीने मोबाईल टॉवर टाकण्यासाठी सबंध शहरातील रस्ते ड्रील करुन पोखरण्यात आले़ उपलब्ध माहितीनुसार जवळपास ८० किमी रस्ते खोदण्यात आलेत़ केबल जोडणीसाठी खोदलेले खड्डे योग्यरित्या बुजविण्यात आले नाहीत़ परिणामी पावसाचे पाणी जमिनीत मुरुन रस्ते दबण्याची शक्यता नाकारता येत नाही़ खाजगी कामासाठी रस्ते खोदताना कुठलीही परवानगी घेतल्या जात नाही़ कोणी रस्ते खोदलेच तर त्यांच्यावर कारवाई केली जात नाही़