श्री विसर्जनाच्या तोंडावर पॅचवर्क
By Admin | Updated: September 8, 2014 00:35 IST2014-09-08T00:16:01+5:302014-09-08T00:35:00+5:30
औरंगाबाद : महापालिकेने श्री गणेश विसर्जनाच्या तोंडावर मुख्य रस्त्यांवरील पॅचवर्क करण्यासाठी आज सकाळी काम हाती घेतले.

श्री विसर्जनाच्या तोंडावर पॅचवर्क
औरंगाबाद : महापालिकेने श्री गणेश विसर्जनाच्या तोंडावर मुख्य रस्त्यांवरील पॅचवर्क करण्यासाठी आज सकाळी काम हाती घेतले. मात्र, सायंकाळी झालेल्या रिमझिम पावसामुळे खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेला मुरूम वाहून गेल्याने श्री विसर्जन मार्गावर खड्डे कायम राहिले.
व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांची कामे सुरू असल्याचे सांगून या वर्षी पॅचवर्क मे महिन्यातच संपविण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे पॅचवर्क यंदा करण्यात आले नाही. जून, जुलै महिन्यांत पॅचवर्कचे काम संथगतीने सुरू होते.
५० कोटी रुपयांच्या व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांमुळे पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले नाही. पॅचवर्कसाठी साडेतीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. सहा प्रभागांसाठी ६० ते ७० लाख रुपये पॅचवर्कसाठी ठेवण्यात आले आहेत. असे असताना गणेश विसर्जनाच्या तोंडावर पालिकेने पॅचवर्क सुरू केले. मुख्य मिरवणूक श्री संस्थान गणपती येथून निघणार असून, तो मार्ग सध्या चांगला आहे. मात्र, एन-१२, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, जालाननगर या भागांतील रस्ते खड्डेमयच आहेत. त्यामुळे तेथे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पॅचवर्क होणे महत्त्वाचे होते.
जबाबदारी कुणाकडे ?
कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सिकंदर अली, अफसर सिद्दीकी यांच्याकडे सहा प्रभागांतील रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, काही भागांमध्ये पॅचवर्क करण्यात आले आहे. मुकुंदवाडी श्री विसर्जन मिरवणूक मार्ग संघर्षनगरपर्यंत आहे. त्या रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. मात्र, पावसामुळे पुन्हा खड्डे झाले. औरंगपुरा विहिरीपर्यंतचा मार्ग सुरळीत करण्यात आला आहे.
काही ठिकाणी डांबरीकरणातून पॅचवर्क करण्यात आले. एन-१२ मिरवणूक मार्गाचे काम आज हाती घेण्यात आले आहे.