प्रधान सचिवांकडून पाटोदा, जोगेश्वरीची अचानक पाहणी
By Admin | Updated: June 23, 2014 00:33 IST2014-06-23T00:20:56+5:302014-06-23T00:33:51+5:30
वाळूज महानगर : राज्याचे प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी कुणालाही थांगपत्ता न लागू देता सूर्योदयापूर्वीच पाटोदा व जोगेश्वरी या गावांना भेटी देऊन स्वच्छता व विकासकामांचा आढावा घेतला.

प्रधान सचिवांकडून पाटोदा, जोगेश्वरीची अचानक पाहणी
वाळूज महानगर : राज्याचे प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी कुणालाही थांगपत्ता न लागू देता सूर्योदयापूर्वीच पाटोदा व जोगेश्वरी या गावांना भेटी देऊन स्वच्छता व विकासकामांचा आढावा घेतला. अचानक भेटी दिल्यामुळे सरपंच, अधिकारी व ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली.
आयएसओ मानांकनप्राप्त पाटोदा, जोगेश्वरी गावातील कामकाजाची माहिती घेण्यासाठी प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, स्वच्छता अभियानचे तालुका समन्वयक एम. ए. पठाण यांना सोबत घेऊन भल्या पहाटे गावांना अचानक भेट देऊन पाहणी केली.
राष्ट्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारप्राप्त गावातील स्वच्छता अभियान तसेच विविध विकासकामांचा आढावा घेऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थ स्वच्छतागृहाचा वापर करतात किंवा नाही याचीही चौकशी करून गावात फेरफटका मारला. यावेळी संधू यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. पाहणी केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करून गावाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
गावाचे प्रेरणास्त्रोत भास्करराव पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, ग्रामविकास अधिकारी आर. डी. चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे एस. एस. संधू यांनी अभिनंदन करून व्हिजीट बुकमध्ये अभिप्राय लिहून अशाच प्रकारचे कार्य राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाटोदा गावाला भेट दिल्यानंतर संधू यांनी लगेच नायगाव-बकवालनगर व जोगेश्वरी या गावांना भेटी देऊन पाहणी केली. प्रधान सचिव संधू यांनी गावातील अंतर्गत रस्ते, स्वच्छता, अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आदींना भेटी देऊन या गावातील विकासकामांची प्रशंसा केली. यावेळी सरपंच योगेश दळवी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ, गटविकास अधिकारी विजय परदेशी, संजय दुबिले, तारा खोचे, प्रकाश साबळे, सूर्यभान काजळे, शिवाजी दुबिले, राजेंद्र त्रिभुवन, कपूरचंद काबरा, नारायण काजळे, कल्याण पेरे, मुरलीधर पेरे, भागचंद पेरे, दीपाली पाटेकर, अशफाक बेग आदींसह दोन्ही गावातील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
संधू यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता दोन्ही ग्रामपंचायतीला भेटी देऊन पाहणी केली. भल्या सकाळीच प्रधान सचिव गावात आल्यामुळे राजकीय मंडळींसह अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.