पाच वर्षांत घाटीचा कायापालट
By Admin | Updated: August 22, 2014 00:21 IST2014-08-21T23:58:13+5:302014-08-22T00:21:26+5:30
बापू सोळुंके, औरंगाबाद शासकीय कॅन्सर हॉस्पिटल हे घाटीचाच अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आमखास मैदान येथे उभारण्यात आलेले भव्य शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले.

पाच वर्षांत घाटीचा कायापालट
बापू सोळुंके, औरंगाबाद
शासकीय कॅन्सर हॉस्पिटल हे घाटीचाच अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आमखास मैदान येथे उभारण्यात आलेले भव्य शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. या हॉस्पिटलची ख्याती ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी याच रुग्णालयास पसंती देत आहेत. परिणामी तेथील खाटा अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने हॉस्पिटलचा दुसरा टप्पा उभारण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
घाटीतील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जातात. कॅन्सरवरील उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथावर पडलेले दिसतात. कॅन्सरच्या रुग्णांना अॅडमिट राहता येईल असे स्वतंत्र शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादेत उभारावे, यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर के ला आणि मंजूर करून घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदान येथील जागाही मिळवून दिली. हॉस्पिटलसाठी निधी कमी पडू दिला नाही. शिवाय हॉस्पिटलचे काम योग्य होते अथवा नाही, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी बांधकामस्थळी भेटीही दिल्या. कंत्राटदाराने उत्कृष्ट बांधकाम करून हॉस्पिटलची नवीन इमारत घाटीच्या ताब्यात दिली. २१ सप्टेंबर २०१२ रोजी हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल झाले. शंभर खाटांची क्षमता असलेल्या या आलिशान हॉस्पिटलमध्ये आठ आॅपरेशन थिएटर आहेत. शिवाय महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, पॅथॉलॉजी लॅब आहे. हॉस्पिटल सुरू झाल्याचे कळताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण तेथे दाखल होऊ लागले. तेथील अद्ययावत यंत्रणा केवळ कॅन्सरच्या पेशीच जाळून टाकते. हे करताना चांगल्या पेशीचे नुकसानही होऊ देत नाही. परिणामी किरणोपचारामुळे होणारे साईड इफेक्टस् येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सोसावे लागत नाहीत. शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार येथे उपलब्ध आहेत. कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी रुग्ण शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला प्राधान्य देत आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
मेडिसीन विभागाला कॉर्पोरेट लूक
घाटीत दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्ण हे मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. विषबाधा, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे रुग्ण, सर्पदंश झालेले, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, चिकुन गुनिया, स्वाईन फ्लू अशा विविध साथींचे रुग्ण, टी.बी., एच.आय.व्ही. एड्स, कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज, अशा विविध प्रकारांच्या आजाराचे रुग्ण मेडिसीन विभागात विविध वॉर्डांत अॅडमिट होतात. जानेवारी २०१३ पूर्वी मेडिसीन विभागाचे विविध वॉर्ड विखुरलेले होते.
प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांची दमछाक होई. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे घाटी रुग्णालय अभ्यागत समितीचे अध्यक्ष असताना २००८ साली त्यांनी मेडिसीन विभागाचे विखुरलेले वॉर्ड एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाकडून निधी मिळवून मेडिसीन विभागासाठी सर्व सुविधा असलेली दोन मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली.
जानेवारी २०१३ मध्ये ही इमारत मेडिसीन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. तेव्हापासून मेडिसीन विभागाचे विविध वॉर्ड, एमआयसीयू, आयसीयू, पॅथॉलॉजी लॅब एकाच छताखाली आणण्यात आले.