प्रवाशांचा जीव टांगणीला
By Admin | Updated: July 23, 2016 01:14 IST2016-07-23T00:24:50+5:302016-07-23T01:14:14+5:30
औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे.

प्रवाशांचा जीव टांगणीला
औरंगाबाद : शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर अवैध वाहतुकीने क हर केला आहे. काळी-पिवळी, खाजगी वाहनांबरोबर छोट्या-मोठ्या मालवाहू गाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून धोकादायकरीत्या वाहतूक केली जात आहे. यातून अशा अवैध वाहतूकदारांची चांदी होत आहे. प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागत आहे.
सिल्लोडहून भाविकांना घेऊन फुलंब्रीकडे जाणारा टेम्पो पुलावरून नदीपात्रात कोसळल्याची घटना बुधवारी पाथ्रीजवळ घडली. या घटनेमुळे अवैध वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जालना रोड, हर्सूल रोड, नगर नाका, बीड बायपाससह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर अवैध वाहतूकदारांकडून प्रवाशांची धोकादायक पद्धतीने ने-आण केली जात आहे. रस्त्यावर एखादा प्रवासी दिसत नाही की, त्याच्या भोवती अशा वाहतूकदारांचा गराडा पडतो. कमी पैशात सोडले जाईल, लहान मुलांचे कोणतेही भाडे घेत नाही, सांगेल तेथे गाडी थांबेल, या बाबींमुळे प्रवासी जिवाची पर्वा न करता अशा वाहनांतून धोकादायक प्रवास करतात.
काळी-पिवळी वाहनांमध्ये कितीतरी अधिक, प्रसंगी थेट मागे दाराला लटकून प्रवाशांची वाहतूक होताना सर्रास दिसत आहे. चालकाच्या बाजूने तर तीन ते चार प्रवासी कोंबले जात आहेत. अशा परिस्थितीत गाडी चालविण्याची कसरत चालक करतो. एखादा अपघात झाल्यानंतर आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो.
‘एसटी’ला प्राधान्य द्या
एस.टी.महामंडळाच्या बसगाड्यांचा प्रवास हा नेहमीच सुरक्षित आहे. शिवाय अपघात विम्याच्या रुपाने सुरक्षा कवच आहे.प्रवाशांनी ‘एसटी’तून प्रवास करण्याला प्राधान्य द्यावा,असे एस.टी.महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी एस.एस.रायलवार म्हणाले.
मालवाहूंचा वापर
प्रवासी वाहतुकीसाठी सर्रास लोडिंग रिक्षापासून छोट्या-मोठ्या मालवाहू वाहनांचा वापर करण्यावर सर्रास भर दिला जातो. अशा वाहनांतून प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरतो. परंतु अनेकदा अशा वाहनांचा प्रवास जिवावर बेतणारा ठरतो. पोलिसांची कारवाई टाळून शहराबाहेर पडण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे.
कारवाई सुरू
अवैध वाहतुकीविरुद्ध १ जुलैपासून कारवाई केली जात आहे. यामध्ये अतापर्यंत अनेक वाहनांवर कारवाई केली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहील,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी सांगितले.