परतूर-मंठा विधानसभा मतदरसंघात इच्छुकांमध्ये रस्सीखेच

By Admin | Updated: August 22, 2014 00:57 IST2014-08-22T00:28:37+5:302014-08-22T00:57:16+5:30

पांडुरंग खराबे, मंठा परतूर-मंठा विधानसभा मतदार संघात इच्छुकांची भाऊ गर्दी असून या सर्वांनी उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

Partur-Mandha Vidhan Sabha | परतूर-मंठा विधानसभा मतदरसंघात इच्छुकांमध्ये रस्सीखेच

परतूर-मंठा विधानसभा मतदरसंघात इच्छुकांमध्ये रस्सीखेच



पांडुरंग खराबे,  मंठा
परतूर-मंठा विधानसभा मतदार संघात इच्छुकांची भाऊ गर्दी असून या सर्वांनी उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
मंठा-परतूर तालुक्याबरोबर नेर-शेवलीचा समावेश असलेल्या या मतदार संघात अपक्षाचा प्रभाव आहे. सद्य:स्थितीला विद्यमान अपक्ष आ. सुरेशकुमार जेथलिया, सभापती बाबासाहेब आकात, प्रा. राजेश सरकटे, राजेश राठोड, माजी आ. बबनराव लोणीकर, ए. जे. बोराडे, पी.एन.यादव, सोमनाथ साखरे यांनी पक्ष किंवा अपक्ष या दोन्ही बाजूने समीकरणे जुळवण्यास सुरुवात केल्याचे कार्यकर्त्यांच्या चर्चेमधून दिसून येते. विद्यमान आ. सुरेशकुमार जेथलिया यांची कॉँग्रेसशी जवळीक असली तरी त्यांचा कॉँग्रेस प्रवेशाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. तर सभापती बाबासाहेब आकात, प्रा. राजेश सरकटे, युवा नेते राजेश राठोड, अ‍ॅड. अन्वर देशमुख यांनीही तिकीट मिळविण्यासाठी कार्यक्षेत्रात विविध कार्यक्रम राबवून मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्या आहेत. कॉँग्रेसकडून जि. प. सदस्य तथा युवानेते राजेश राठोड, प्रदेश युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. अन्वर देशमुख यांनीही तिकिट मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान जेथलिया हे दोघांवर मात करुन तिकिट मिळविण्यात यशस्वी होतात का, यावर जोरदार तर्कवितर्क लढविले जात आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब आकात यांनीही तिकिटासाठी तगडी मोर्चेबांधणी चालविली आहे. त्यांचे तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे आहे. दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंंगणात उतरणार असल्याचे त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगत आहे. त्यांनी गावनिहाय दौरे करुन वातावरण निर्मिती करुन तगडे आवाहन उभे केले आहे. हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. राजेश सरकटे यांनी गत सहा महिन्यांपासून विविध सामाजिक कार्यक्रम राबवून ‘परिवर्तनाची हवा’ निर्माण केली आहे. भाजपाकडून तिकिटासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याची चर्चा आहे. त्यांच्या सक्रियतेने मात्तबर हवालदिल झाल्याची चर्चा आहे.
भाजपाकडून जिल्हाध्यक्ष माजी आ. बबनराव लोणीकर, बाबासाहेब तेलगड, बळीराम कडपे, सुभाष राठोड यांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी केली आहे. मनसेकडून जिल्हाप्रमुख (जनहित कक्ष) पी. एन. यादव, शिवसेनेकडून उद्योगपती सोमनाथ साखरे, ए. जे बोराडे हे इच्छूक असून त्यांना धनुष्यबाण मिळणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
गतवर्षी शिवसेनेच्या ताकदीवर अपक्ष म्हणून आ. सुरेशकुमार जेथलिया विजयी झाले. यावेळी ते कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जात असले तरी पण पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांतून नाराजीचा सूर आहे. प्रा. सरकटे यांच्या होर्डिंगबाजीमुळे मतदारसंघात वातावरण आणखी गरम होत आहे. जि. प. सदस्य राजेश राठोड यांनीही निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे तिकिट मिळाल्यास सर्वात प्रभावी उमेदवार राहणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. माजी आ. धोंडीराम राठोड यांच्या विकास कामाचा फायदा त्यांना होऊ शकतो. तर भाजपामध्ये अनेकांनी दंड थोपटल्याने प्रा. राजेश सरकटे काय किमया करुन तिकीटाचा करिश्मा घडवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बदल ‘हवा आहे, चेहरा नवा आहे’ या घोषवाक्यात मोठा दम असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
तर दुसरीकडे प्रा. राजेश सरकटेंना भाजपाने तिकीट दिल्यास माजी आ. बबनराव लोणीकर, अपक्ष उमेदवार सभापती बाबासाहेब आकात यांच्या पारड्यात आपले वजन टाकून आपल्यावरील पूर्वीचे आमदारकीचे ऋण फेडतील आणि सभापती आकात बाजी मारतील असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. या चर्चेमुळे निवडणूकीपूर्वी गरमागरम चर्चा ऐकावयास मिळत असताना कोण काय खेळी करतो आणि कोणाला कोणाचे समर्थन मिळते यावरही विधानसभेचे गणित अवलंबून आहे. शेवटी कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण निवडणूक रिंंगणात उतरतो यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून असून, आजरोजी फक्त तर्कवितर्कच लढविले जात आहेत. तर वेगवेगट्या वावड्यांनी निवडणुकीतील गर्मी वाढविली आहे.

Web Title: Partur-Mandha Vidhan Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.