परसोडा रेल्वेस्थानक मोजतय शेवटच्या घटका?
By Admin | Updated: April 17, 2016 01:33 IST2016-04-17T01:20:47+5:302016-04-17T01:33:27+5:30
सुभाष कवडे , परसोडा वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील निजामकालीन रेल्वेस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रेल्वेस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी साध्या बाकापासून ते स्वच्छतागृह, अ

परसोडा रेल्वेस्थानक मोजतय शेवटच्या घटका?
सुभाष कवडे , परसोडा
वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील निजामकालीन रेल्वेस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रेल्वेस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी साध्या बाकापासून ते स्वच्छतागृह, अशी कोणतीही सुविधा नाही. एवढेच नव्हे येथील निजामकालीन इमारत पडण्याच्या मार्गावर असल्याने हे स्थानक शेवटच्या घटका मोजत आहे.
रेल्वे प्रशासनाने मनमाड ते नांदेडपर्यंतचे परसोडा वगळता अन्य सर्व रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले. परसोडा येथील निजामकालीन रेल्वेस्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे. प्लॅटफॉर्मवरील फरशी पूर्णपणे तुटल्याने प्रवाशांना ठेचा खात तुटलेल्या फरशांवरून ये-जा करावी लागते. स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी असलेले बाक तुटले आहेत. निवारा शेडची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली आहे. येथील सार्वजनिक शौचालय १९७२ पासून बंद पडलेले आहे.
रेल्वेस्थानक गावाच्या विरुद्ध दिशेने असल्याने प्रवाशांना गावाच्या दिशेने जाण्यासाठी दोन रेल्वे पटऱ्या ओलांडाव्या लागतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, दोन प्रवाशांना जीव गमवावा लागला. स्थानकावरून वीस ते पंचवीस गावांतील प्रवासी ये-जा करतात. नवीन रेल्वेस्थानकाची इमारत ही जुन्या स्थानकाजवळ बांधण्याऐवजी गावाच्या दिशेने व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक रवींद्र गुप्ता, नांदेड डिव्हिजनचे आर.के. सिन्हा व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन देण्यात आले होते. या रेल्वेस्थानकाची मंजूर झालेली नवीन इमारत ही गावाच्या दिशेने व्हावी यासाठी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच मनीषा मरमट, उपसरपंच रमेशराव धाडबळे यांनी दिला. शिवाय मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन लावून धरू, असे शिवसिंग छानवाल, साहेबराव धाडबळे, रामभाऊ कवडे, प्रतापसिंग मरमट, ज्ञानेश्वर कवडे, शेख फकीर महंमद, अंबरसिंग नागालोत, भगवान कवडे, किशोर धाडबले, हंसराज छानवाल, अंकित लोहाडे, शरद नामपल्ली, संजय कवडे यांच्यासह बोरसर, भिवगाव, संबरगाव, परसोडा, सज्जरपूरवाडी, विनायकनगर येथील सरपंच, उपसरपंचांनी सांगितले.