रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा खर्च झाला एकदम दुप्पट...

By Admin | Updated: June 12, 2014 01:33 IST2014-06-12T01:16:03+5:302014-06-12T01:33:49+5:30

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात दुप्पट वाढ झाली असल्यामुळे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या खर्चापेक्षा पार्किंगसाठीच जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

The parking expenses at the railway station were almost double ... | रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा खर्च झाला एकदम दुप्पट...

रेल्वेस्थानकावरील पार्किंगचा खर्च झाला एकदम दुप्पट...

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात दुप्पट वाढ झाली असल्यामुळे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटाच्या खर्चापेक्षा पार्किंगसाठीच जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
पार्किंगचे दर वाढल्यामुळे काही मिनिटांसाठी दुचाकीचालकांना १० रुपये, तर चारचाकीचालकांना २० रुपये मोजावे लागत आहेत. या वसुलीमुळे वाहनचालक आणि पार्किंग चालकांमध्ये वाद होत आहेत.
औरंगाबाद रेल्वेस्थानकावर येणारे प्रवासी व वाहनांची संख्या पाहता यंदा दक्षिण मध्य रेल्वेने पार्किंगच्या कंत्राटाची रक्कम वाढविली. १ मेपासून आगामी तीन वर्षांसाठी नव्या कंत्राटदाराकडे पार्किंगची व्यवस्था असून, दुचाकीसाठी पूर्वीचे ५ रुपये आज १० रुपये करण्यात आले आहेत. स्टेशनवर प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्यांना काही मिनिटांसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त नियमितपणे ये-जा करणाऱ्यांनाही या दरवाढीचा फटका बसला आहे. यामुळे गेल्या महिन्यापासून वाहनचालक आणि पार्किंगचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत आहे. रेल्वे प्रशासनेच दरवाढीला संमती दिल्यामुळे अधिकारीही पार्किंगचे दर योग्य असल्याचे सांगतात.

पार्किंगवाल्यांची अरेरावी
दुचाकीसाठी सहा तासांसाठी १०, बारा तासांसाठी २० तर २४ तासांसाठी ४० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, पार्किंगवाल्यांकडून मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात आहेत.
दर फलक लावलेला असताना पार्किंगचालक अनेकदा १२ तासांसाठी ४० रुपये वसूल करून अरेरावी करीत आहेत. पावती देण्याचेही अनेकदा टाळले जाते.
उन्हात वाहने
पार्किंगचे दर वाढविण्यात आले असले तरी गेल्या अनेक वर्षांत पार्किंगच्या सुविधेत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
शेड नसल्यामुळे भरउन्हात, पावसात वाहने उभी करावी लागतात.
कंत्राट २.४४ कोटींचे
२.४४ कोटी रुपयांत पार्किंगचे कंत्राट घेण्यात आल्याची माहिती पार्किंगच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.
एवढी मोठी रक्कम आणि कर्मचाऱ्यांचे वेतन, नफा आदी खर्च तीन वर्षांत वाहनचालकांकडूनच वसूल केला जाणार असे दिसते.
दिलेल्या दरानुसार
१ मेपासून पार्किंगचे कंत्राट नव्या कंत्राटदाराकडे गेले आहे. पार्किंगचे दर वाढलेले असले तरी ते रेल्वेने मान्य केलेले आहेत. शहरातील इतर ठिकाणीही पार्किंगचे दर असेच आहेत.
- के. बापूराव,
चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर
तिकिटांपेक्षा पार्किंगचा खर्च जास्त
औरंगाबाद रेल्वेस्थाकाच्या पार्किंगचे कंत्राट देशातील सर्वाधिक मोठ्या रकमेचे ठरले आहे. अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांपेक्षा पार्किंगसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. आचारसंहितेमुळे दरवाढीला विरोध करता आला नाही. झालेली दरवाढ रद्द करून जुने दर ठेवण्याची गरज आहे.
-संतोषकुमार सोमाणी,
अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना
वाढीव दराची कल्पना
रेल्वे प्रशासनाच्या सूचनेप्रमाणेच दर निश्चित करण्यात आले आहेत. सुरुवातीलाच आम्ही स्वत: पार्किंगच्या वाढीव दरामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची कल्पना रेल्वे प्रशासनाला दिली होती. पार्किंगच्या दराविषयी संभ्रम, शंका व्यक्त करणाऱ्यांना योग्य माहिती दिली जाते. दराची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत.
-मोहम्मद नईम, व्यवस्थापक, पार्किंग

Web Title: The parking expenses at the railway station were almost double ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.