पालक, शिक्षकही झाले सतर्क
By Admin | Updated: March 4, 2015 00:22 IST2015-03-04T00:16:53+5:302015-03-04T00:22:43+5:30
जालना : शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुले पळविण्याच्या अफवांनी पोलिसांसह पालक आणि शिक्षकही सतर्क झालेले आहेत.

पालक, शिक्षकही झाले सतर्क
जालना : शहर व परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुले पळविण्याच्या अफवांनी पोलिसांसह पालक आणि शिक्षकही सतर्क झालेले आहेत. शहरात दोन मुलींना पळविण्याचा प्रयत्न झाला, तर अन्य अफवा मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत. या सर्व प्रकारांबाबत सत्यता पडताळणी करावी, असा सूर मंगळवारी ‘लोकमत परिचर्चे’ तून निघाला.
शहरात २७ फेबु्रवारी रोजी जुना जालन्यात रोशनी लाड व २ मार्च रोजी नवीन जालना भागातील काजल घोरपडे या शालेय विद्यार्थिनीस पळविण्याचा प्रयत्न झाला. या व्यतिरिक्त अन्य काही भागातही अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या. या प्रकारांमुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तर पोलीस यंत्रणेकडून या सर्व अफवा असल्याचा दावा करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत ‘लोकमत’च्या जालना जिल्हा कार्यालयात झालेल्या परिचर्चेत सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, शांतीनिकेतन विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, कदीम जालना ठाण्यातील शांतता कमिटीचे सदस्य गणेश सुपारकर व पालक मनोज लाड यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी बल्लाळ म्हणाले, मुले पळविणारी टोळी किंवा व्यक्तीला कोणीही पाहिलेले नाही. सर्व अफवा उठविल्या जात आहे. घटना घडायची असल्यास ती कोठेही घडू शकते. जालन्यात ज्या दोन घटना (पळविण्याचा प्रयत्न) घडल्या, त्याची सत्यता पडताळणी करण्यात येईल. मुख्याध्यापक गाढवे म्हणाले, या अफवा आहे की, खऱ्या घटना, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. या चर्चेमुळे पालक मात्र सतर्क झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सुपारकर यांनी अशा घटनांची पोलिसांनी सत्यता पडताळून पालकांमध्ये पसरलेली भीती दूर करणे गरजेचे आहे, असे सांगितले. पालक लाड यांनी आपल्या पुतणीला पळविण्याचा प्रयत्न झाला होता, ही बाब खरी असल्याचा दावा केला. त्यामुळे अशा घटना शहरात पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शहरात पसरलेल्या अफवांमुळे पालक, शिक्षक आणि पोलीस ही सर्तक झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांमध्ये विविध शाळांमध्ये कमी असलेली विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र पूर्वीप्रमाणे कायम असल्याचे म.स्था. जैन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा श्रीपत यांनी सांगितले. पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक लक्ष देत आहे.