परभणीला अधिकारी येईनात
By Admin | Updated: June 15, 2017 00:06 IST2017-06-15T00:05:42+5:302017-06-15T00:06:23+5:30
परभणी :इतर जिल्ह्यातून परभणी येथे बदली झालेले अधिकारी परभणीत येण्यास उत्सूक नसल्याने येथून बाहेर जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी परभणीत अडकून पडले आहेत.

परभणीला अधिकारी येईनात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : इतर जिल्ह्यातून परभणी येथे बदली झालेले अधिकारी परभणीत येण्यास उत्सूक नसल्याने येथून बाहेर जिल्ह्यात बदली झालेले अधिकारी परभणीत अडकून पडले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी बदलीचे आदेश निघूनही या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप पदमुक्त केलेले नाही.
येथील जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी बदल्या झाल्या आहेत. त्यात पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर यांची बदली नांदेड येथे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची बदली नांदेड येथे झाली आहे. तर सेलू येथील उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यांची बदली हिंगोली येथे झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राजेश खंदारे यांची बदली उस्मानाबाद येथे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे.
जिल्ह्यातील चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांच्या जागी तीन नवीन अधिकारी जिल्ह्याला मिळाले आहेत.
नांदेड येथील निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच औरंगाबाद येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांची बदली परभणीत भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी पदी झाली ंआहे. बदल्यांचे आदेश निघून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी हे अधिकारी परभणीत रुजू झाले नाहीत. त्यामुळे येथून इतर ठिकाणी बदली झालेले अधिकारीही अडकून पडले आहेत.