परभणी, नांदेडच्या ‘एसटी’ फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:06+5:302021-06-29T04:04:06+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परभणीत सार्वजनिक वाहतूक ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, औरंगाबादहून धावणाऱ्या एसटी ...

परभणी, नांदेडच्या ‘एसटी’ फेऱ्या रद्द
औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परभणीत सार्वजनिक वाहतूक ३ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, औरंगाबादहून धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या परभणी, नांदेड, निजामाबादच्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सिडको बसस्थानकातून धावणाऱ्या नांदेडच्या बसेस या मंठ्यापर्यंतच धावल्या.
सिडको बसस्थानकातून नांदेडसाठी १२ रोज बसेस धावतात. यात सोमवारी केवळ ४ बसेस मंठ्यापर्यंतच चालविण्यात आल्या. उर्वरित फेऱ्या रद्द करण्यात आल्या. नांदेडच्या बसेस मंगळवारी रिसोडमार्गे चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी सांगितली. मध्यवर्ती बसस्थानकातील नांदेड आणि निजामाबाद बसची फेरी रद्द करण्यात आली. गंगापूर आगारातून धावणाऱ्या परभणीच्या २ फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. बसफेऱ्या रद्द झाल्याने बसेस आगारात उभ्या असल्याचे चित्र मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकात पाहायला मिळाले.
विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, परभणीतील निर्बंधांमुळे या मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
फोटो ओळ...
मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या बसेस.
सिडको बसस्थानकात नांदेड वगळता अन्य मार्गावरील बससेवा सुरू होती.