समांतर योजना म्हणजे निव्वळ भ्रमाचा भोपळा!
By Admin | Updated: August 21, 2014 00:11 IST2014-08-21T00:09:14+5:302014-08-21T00:11:37+5:30
औरंगाबाद : महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पीपीपी मॉडेलवर तयार केलेली समांतर जलवाहिनीची योजना ही भ्रमाचा भोपळा आहे. पाण्याचा बाजार मांडण्याचा संकल्प त्या योजनेतून सोडण्यात आला

समांतर योजना म्हणजे निव्वळ भ्रमाचा भोपळा!
औरंगाबाद : महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पीपीपी मॉडेलवर तयार केलेली समांतर जलवाहिनीची योजना ही भ्रमाचा भोपळा आहे. पाण्याचा बाजार मांडण्याचा संकल्प त्या योजनेतून सोडण्यात आला असून, सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्या या योजनेच्या विरोधात औरंगाबाद सामाजिक मंच लढा देणार असल्याची भूमिका आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. जनतेवरील भुर्दंड वाचविल्याचा आव मनपा सत्ताधारी, त्यांचे नेते व प्रशासनाने आणल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पाण्याच्या बाजारीकरणाच्या विरोधात जनक्रांती होऊन आंदोलन उभारले जावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
२०११ पासून आजवर या योजनेविरोधात अनेक आंदोलने सुरू आहेत. तरीही पालिकेने कुणाला जुमानले नाही. खा.चंद्रकांत खैरे, आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्या माहितीमध्ये विसंगती आहे. शिवाय पालिकेच्या बेबसाईटवर वेगळीच माहिती देण्यात आलेली आहे. २०० कोटी रुपये वाचविण्याचा केलेला दावा हा भ्रमाचा भोपळा आहे. ३ हजार कोटी रुपयांपर्यंतची वसुली औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी ही कंपनी २० वर्षांच्या काळात करील, असा आरोप मंचचे प्रा. विजय दिवाण यांनी केला. यावेळी सुभाष लोमटे, उद्धव भवलकर, अण्णा खंदारे, सुखदेव बन, अजमत खान यांची उपस्थिती होती.
जायकवाडी धरणातील सध्या असलेला पाणीसाठा व भविष्यातील पाण्याची गरज याचा काहीही विचार ही योजना तयार करताना केलेला नाही. डीएमआयसी आल्यानंतर या धरणावर त्याचा ताण पडणार आहे. १२ टीएमसी पाणी समांतर जलवाहिनीसाठी लागेल. ते कुठून आणणार. २०० गावे आणि सिंचनाच्या प्रश्नांची उत्तरे पालिका देणार काय, योजनेच्या प्रोजेक्शनवरच शंका असल्याचे प्रा.दिवाण म्हणाले.