पानिपत...धोक्याची घंटाच !

By Admin | Updated: May 18, 2014 00:50 IST2014-05-18T00:44:12+5:302014-05-18T00:50:36+5:30

संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत निसटता विजय मिळविणार्‍या खा. रावसाहेब दानवे यांनी या निवडणुकीत २ लाख ७ हजार २५९ एवढ्या मोठ्या मताधिक्याचा पल्ला गाठून भाजपचा गड अभेद्य राखला.

Panipat ... alarm clock! | पानिपत...धोक्याची घंटाच !

पानिपत...धोक्याची घंटाच !

संतोष धारासूरकर , जालना गेल्या निवडणुकीत केवळ ८ हजार ४८२ एवढ्याच अल्प मताधिक्याने निसटता विजय मिळविणार्‍या खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी या निवडणुकीत २ लाख ७ हजार २५९ एवढ्या मोठ्या मताधिक्याचा पल्ला गाठून भाजपचा गड अभेद्य राखला.त्याबरोबरच सत्तारूढ काँग्रेस आघाडीत धडकी भरविली आहे. सोळाव्या लोकसभा निवडणुकीत खा. दानवे यांनी विजयाचा चौकार मारला. त्याव्दारे जुने-पुराने सर्व हिशोब चुकते केले. विशेषत: गेल्या निवडणुकीत सळो की पळो करुन सोडणार्‍या काँग्रेसजनांच्या तोंडचे पाणी पळवले. गेल्या निवडणुकीत काँग्रेसजनांनी दानवेंची चांगलीच दमछाक केली होती. त्यातुन दानवे कसबसे सहीसलामत बाहेर पडले. परंतु विजयाची हॅटट्रीक करतेवेळी ८ हजार ४८२ एवढ्याच अल्प मताधिक्याचे शल्य दानवेंना बोचत होते. त्याचाच हिशेब या निवडणुकीत करण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता. परंतु, काँग्रेस आघाडीने पुन्हा उचल खाल्ली. प्रबळ सत्तास्थानांच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात राळ उडविली. विशेषत: कार्यपद्धतीवर, वैयक्तिक पातळीवरसुद्धा जोरदार हल्ले चढविले. त्याव्दारे दानवेंना अक्षरश: घायाळ केले. एकाकी किल्ला लढविणार्‍या दानवे यांनी काँग्रेसजनांच्या या आक्रमणास तेवढ्याच दमदारपणे प्रत्युत्तर दिले. आणि गेल्या निवडणुकीतील निसटत्या विजयाचा शिक्का पुसला. तोही २ लाख ७ हजार २५९ एवढ्या मोठ्या मताधिक्यानिशी. या मतदारसंघात भाजपने ओळीने सहा वेळा, त्यात दानवे यांनी ओळीने चौथ्यांदा विजय पटकाविला. आजवर भाजपने येथून आठवेळा यश मिळविले आहे. त्यात आतापर्यंत एवढे मोठे मताधिक्य एकाही उमेदवारास मिळालेले नाही. दानवे हे त्यात नशीबवान ठरले आहेत. जालन्यातील त्यांचे हे प्रचंड मताधिक्य मराठवाड्यातसुद्धा सर्वाधिक ठरले आहे. ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे दोघे मातब्बरसुद्धा दीड लाखांचासुद्धा पल्ला गाठू शकले नाहीत. दानवेंनी ती कामगिरी केली. त्याव्दारे भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राखला. वास्तविकता या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीने दानवेंना लोळविण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत दानवेंना प्रस्थापित ठरवून जोरदार हल्ला चढविला. मोदी लाटेत दानवेविरोधी हवा निर्मितीचा प्रयत्न केला. परंतु, ते डगमगले नाहीत. भक्कम अनुभवाच्या शिदोरीवरच एकाकी किल्ला लढविणार्‍या दानवेंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना जोरदार धडक मारून खिंडार पाडले. त्यांचे हे यश आघाडीस निश्चितच धडकी भरवणारे व आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारे आहे. सहाही ठिकाणी पानिपत जालना, बदनापूर, भोकरदन या जिल्ह्यातील तीन व पैठण, सिल्लोड व फुलंब्री या औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ काँग्रेस आघाडीचे मोदी लाटेत अक्षरश: पानिपत झाले आहे. एकाही ठिकाणी आघाडी बरोबरीतसुद्धा राहू शकली नाही. गेल्या निवडणुकीत खा. दानवे विरूद्ध आ. कल्याण काळे यांच्यातील तुल्यबळ लढतीत काँग्रेस आघाडीने १५ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. त्याच जालना विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत खा. दानवे यांनी २९ हजार २९९ एवढे मोठे मताधिक्य मिळवून काँग्रेस आघाडीस मोठा धक्का दिला. गेल्या निवडणुकीतील हिशोब चुकता केला. आ. गोरंट्याल यांना महायुतीचे हे मताधिक्य निश्चितच धक्का देणारे आहे. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जालन्यातून मिळालेल्या या मताधिक्याने आत्मविश्वास ऊंचावणार हे स्पष्ट आहे. बदनापूरचा मताधिक्याचा विक्रम बदनापूर विधानसभा मतदारसंघाने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूनेच भरभरून कौल दिला आहे. गेल्या २००९ च्या निवडणुकीत खा. दानवेंना येथून सुमारे ६ हजार ६८ एवढे मताधिक्य मिळाले होते. २००४ च्या निवडणुकीत दानवेंना १४ हजार ३२८, १९९९ च्या निवडणुकीत खा. दानवे यांना ११ हजार ४९५, १९९८ मध्ये युतीचे उमेदवार उत्तमसिंग पवार यांना ३ हजार २५१, १९९६ मध्ये युतीचे उत्तमसिंग पवार ३१ हजार ३३१, १९९१ मध्ये पुंडलिक हरि दानवे यांना ४ हजार ९१७ तर १९८९ च्या निवडणुकीत पुंडलिक हरि दानवे यांना १६ हजार ४६ एवढे मोठे मतधिक्य बदनापूर विधानसभेने दिले होते. या मतदारसंघातून १९९६ साली सर्वाधिक म्हणजे ३१ हजार ३३१ एवढे मोठे मताधिक्य युतीस मिळाले होते. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत या मतदारसंघाने महायुतीच्या बाजुने भक्कमपणे पाठबळ उभे केले. येथून खा. दानवे यांनी ओळीने चौथ्यांदा विजय मिळविताना आजवरचे सर्वाधिक म्हणजेच ४६ हजार ९३१ एवढे मताधिक्य मिळविले आहे. येथून दानवे यांना १ लाख ५ हजार ११ तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना ५८ हजार ८० एवढी मते मिळाली आहेत. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. आ. संतोष सांबरे सध्या नेतृत्व करीत आहेत. भोकरदनवासीयांचे प्रेम घटले खा. दानवे यांचे भोकरदन हे ‘होमपीच’. येथूनच दानवे यांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळविले. मात्र, या निवडणुकीत दानवे यांना येथून केवळ २८ हजार २३८ एवढेच मताधिक्य मिळाले. सहा विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याची आकडेवारी पडताळल्यास भोकरदन या मतदारसंघात दानवेंना सर्वात कमी मताधिक्य आहे. उर्वरित पाच विधानसभेत दानवे मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे भोकरदन याच तालुक्यास भाजपने सातत्याने न्याय दिला. लोकसभा निवडणुकीत एकदा नव्हे, नऊवेळा भोकरदनमधीलच उमेदवाराला उमेदवारी देऊन मोठी संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत भोकरदननेही भाजपालाच साथ दिली खरी, परंतु या निवडणुकीत दानवे हे आपल्या होमपीचमधूनच मताधिक्यात पिछाडीवर राहिले आहेत. दानवेंचे घटलेले हे मताधिक्य विचार करण्यासारखे आहे. याच भागात दानवेंचा मोठा दबदबा असताना, सहकार, शिक्षणक्षेत्रात काम असतानासुद्धा दानवे मताधिक्यात पिछाडीवर राहिले हे विशेष. या मतदारसंघात या निवडणुकीत सर्वाधिक मतदान झाले. त्याची टक्केवारी ६६ टक्क्यांच्या पुढे आहे. वाढलेली टक्केवारी दानवेंना पुरक ठरेल, असे वाटले होते. मात्र, घडले भरलेच. मताधिक्यात दानवे पिछाडीवर राहिले. आ. चंद्रकांत दानवे यांचा थोडासा का असेना प्रभाव मानावाच लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केलेल्या शक्तीप्रदर्शनातून आघाडीच्या पुढार्‍यांनी ऐक्याच्या गप्पा मारल्या. आप-आपल्या कार्यक्षेत्रातून मोठे मताधिक्य देऊ, अशा वल्गना केल्या. ‘मताधिक्याची स्पर्धा रंगली आहे’ असा छातीठोकपणे दावा केला. परंतु रंगलेल्या लढतीतील त्या गप्पा मतदानयंत्रात उतरल्याच नाहीत. त्या हवेतच विरल्या. निवडणूक निकालातून ते चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाले किल्ल्यातच आघाडीला सुरूंग लागला. आघाडीतील बिघाडीच हेच त्यामागचे महत्वपूर्ण कारण आहे.

Web Title: Panipat ... alarm clock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.