जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनामे
By Admin | Updated: June 5, 2014 00:50 IST2014-06-05T00:25:24+5:302014-06-05T00:50:40+5:30
जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वार्यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने घरांवरील पत्रे उडाली. तर असंख्य झाडे उन्मळून पडली.
जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनामे
जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वार्यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने घरांवरील पत्रे उडाली. तर असंख्य झाडे उन्मळून पडली. यामुळे जीवित हानी वगळता घरांचे मोठे नुकसान झाले. विद्युत तारा निखळल्या, खांबही पडले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात २ व ३ जून रोजी अनेक ठिकाणी वादळी वार्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या वादळी वार्यासह गारपिटीमुळे अनेक शेतकर्यांच्या घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले. त्याचप्रमाणे झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटणे, विद्युत खांब पडणे यासारखे प्रकारही घडले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत संबंधित गावात जाऊन पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जालना तालुक्यातील मानेगाव, निपाणी पोखरी, नसडगाव, घोडेगाव, धानोरा, टाकरवन, हस्तेपिंपळगाव, मोतीगव्हाण, हिवर्डी या भागात नुकसान झाले. चार्याच्या थप्प्याही उडाल्या. उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा व तहसीलदार जे.डी. वळवी यांनी मंगळवारी या भागाचा दौरा करून बाधित भागांची पाहणी केली. या भागाचा पंचनामा करून अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा,आणि बदनापूर या तालुक्यांतील काही गावांमध्येही वादळी वार्यासह गारपीट झाली. या भागातील पंचनामेही करावेत, अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)पारडगाव भागात मोठे नुकसान पारडगाव - घनसावंगी तालुक्यातील पारडगांव परिसरातील यावलपिंप्री, पांगरा, पारडगाव येथे ३ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अवकाळी वार्यासह पावसाने हजेरी लावली. घरावरचे पत्रे उडून गेले तसेच परिसरातील १५ ते २० विद्युत खांब पडले. तारा तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नुकसान झालेल्या गावांची पाहाणी करण्यासाठी घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, सुधीर देशमुख, आर. बी. माळी आणि एम. एस. ई. बी. चे सहाय्यक अभियंता गुजरगे, रांजणीचे दुय्यम अभियंता एस. पी. पासवान यांनी गावात येवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तलाठी गैरहजर होते. ग्रामस्थांनी तहसीलदारांना गावात तलाठी येत नसल्याचे सांगितले. तेव्हा तहसीलदार यांनी सांगितले की, तलाठी पंचनामे करण्यासाठी गावात येईल. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठ्याबद्दल ग्रामस्थांनी गावात येत नसल्याबाबत तक्रार केलेली आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले, आजपर्यंत आम्ही तलाठी यांना बघितले सुध्दा नाही. गोरगरिबांच्या घरावरचे पत्र उडालेले असून काही ग्रामस्थांच्या घरावर पत्रा सुध्दा नाही, अशी ग्रामस्थाची परिस्थिती आहे.