पंचायत समित्यांच्या कारभाराची झाडाझडती
By Admin | Updated: July 2, 2014 00:27 IST2014-07-01T23:25:00+5:302014-07-02T00:27:13+5:30
संजय कुलकर्णी, जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रत्येक पंचायत समित्यांमधील अभिलेखांची तसेच पूर्ण, अपूर्ण कामांची तपासणी सुरू केली आहे

पंचायत समित्यांच्या कारभाराची झाडाझडती
संजय कुलकर्णी, जालना
जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रत्येक पंचायत समित्यांमधील अभिलेखांची तसेच पूर्ण, अपूर्ण कामांची तपासणी सुरू केली आहे. महिनाभरात कारभार न सुधारल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सीईओंनी दिला आहे.
ग्रामीण भागाच्या विकास कामांचे केंद्र समजल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांमधील कारभार विस्कळीत असल्याचा प्रकार मागील काही दौऱ्यांमध्ये खुद्द सीईओंच्या निदर्शनास आला होता. कृषी, समाजकल्याण, पाणीपुरवठा या विभागाअंतर्गतच्या वाटप करावयाचे साहित्य, इंदिरा आवास योजनेअंतर्गतच्या निर्धूर चुली, ब्लँकेटचे वाटप अद्यापही झालेले नाही.
मार्च २०१४ पूर्वीपासून हे साहित्य पंचायत समित्यांकडे पडून आहे. गेल्या महिन्यात पालकमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप हंगामपूर्व तयारी बैठकीत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे साहित्य वाटप झाला नसल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी पालकमंत्र्यांनी सीईओंना या बाबत दखल घेण्याची सूचना केली होती. त्याचप्रमाणे पंचायत समित्यांमधील अन्य कामकाजासंबंधीही काही तक्रारी सीईओंना प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सीईओ देशभ्रतार यांनी आपल्या अध्यक्षतेखाली १२ विभागांमधील २४ जणांचे एक पथक तयार केले आहे. पथकात तपासणी अधिकारी व नियंत्रक अधिकाऱ्यांसह अन्य २२ जणांचा सहभाग आहे. गेल्या महिनाभरात चार पंचायत समित्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.
या पथकांमार्फत जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांची तपासणी सध्या सुरू आहे. यामध्ये ३० व ३१ मे रोजी बदनापूर, ५ व ६ जून रोजी जालना, ११ व १२ जून रोजी घनसावंगी, १७ जून रोजी मंठा (येथील तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही) तसेच भोकरदन येथे २६ व २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. तर उर्वरित पंचायत समित्यांची तपासणी सुरू आहे.
या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींची खातरजमा विभागप्रमुखांकडून केली जात आहे. अपूर्ण अभिलेखे, कामे पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. महिनाभरात ही कामे पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सीईओ देशभ्रतार यांनी दिला आहे.
शंभर मुद्यांवर होतेय पंचायत समित्यांची तपासणी
ही दप्तर तपासणी शंभर मुद्यांवर आधारित आहे. यामध्ये प्रामुख्याने सेवापुस्तिका अद्ययावत करणे, संगणक हाताळणी करणे, माहिती अधिकार, ग्रामपंचायत दप्तर तपासणी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखान्यांची तपासणी, पाणीपुरवठ्याशी संबंधित अपूर्ण कामे, निरूपयोगी साहित्य, निरुपयोगी वाहने, सर्व नोंदवह्या, विविध प्रकारच्या अपूर्ण कामांची तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नियमित दौरे केले किंवा नाही, याबाबतची तपाणी करण्यात येत आहे.