पालखी मराठवाड्यात
By Admin | Updated: June 16, 2014 00:13 IST2014-06-16T00:04:29+5:302014-06-16T00:13:44+5:30
राजकुमार देशमुख, सेनगाव ‘राजा शेगावीचा’ संत गजानन महाराज पालखीचे रविवारी सकाळी मराठवाड्यात पानकनेरगाव मार्गे आगमन झाले. ‘श्रीं’ च्या पालखीचे भाविकांनी मोठ्या आनंदोत्सवात
पालखी मराठवाड्यात
राजकुमार देशमुख, सेनगाव
‘राजा शेगावीचा’ संत गजानन महाराज पालखीचे रविवारी सकाळी मराठवाड्यात पानकनेरगाव मार्गे आगमन झाले. ‘श्रीं’ च्या पालखीचे भाविकांनी मोठ्या आनंदोत्सवात श्रद्धेने मराठवाडा सरहद्दीवर स्वागत केले.
पुंडलिके सुख दाखविले लोका। विठ्ठल नाम नौका तरावया
जाय पंढरीशी जाय पंढरीशी। पाहू विठोबाशी डोळेभरी।।
अवघा पर्वकाळ तथाचिये पायी। नको आणिके ठायी जावू वाया
चोखा म्हणे एैसा लाभ बांधा गाठी। जायोनिया मिठी पाया घाला।।
या संत श्री चोखा महाराज यांच्या अभंगानुसार मनाशी भाव बाळगत मागील ४६ वर्षांपासून आषाढी एकादशीकरिता पायदळ वारी करणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे १५ जूनला सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव मार्गे मराठवाड्यात आगमन झाले. ‘गण गण गणात बोते’ चा जयघोष करीत पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या या पालखीचे तालुक्यातील सेनगाव- रिसोड मार्गावर विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. मराठवाडा- विदर्भ सरहद्दीवर वाढोणा, खैरखेडा, पानकनेरगाव या गावातील भाविकांनी पालखी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता पालखीचे पानकनेरगाव येथे आगमन झाले. यावेळी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी सहा वाजता पालखी सेनगावात दाखल झाली. ‘श्रीं’ च्या पालखीचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणीही भाविकांची गर्दी होती. सेनगाव येथील जि. प. प्रशालेच्या प्रांगणात ‘श्रीं’च्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या वतीने यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. पालखी सोहळ्यात ५५० वारकऱ्यांसह, अश्व सहभागी असून पालखीचे यंदाचे ४७ वे वर्षे आहे. या पालखीचा दोन महिन्याचा पायदळवारी प्रवास असून एकूण १३०० कि. मी. प्रवास ‘श्रीं’ची पालखी यावर्षीही करणार आहे. उद्या सोमवारला पालखी नर्सी नामदेवमार्गे, डिग्रस कऱ्हाळेकडे रवाना होणार आहे. पोनि एस. एम. फुलझळके यांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.