गरज नसताना आता ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST2021-02-05T04:15:15+5:302021-02-05T04:15:15+5:30

औरंगाबाद : मेल्ट्रॉन येथील कोविड हॉस्पिटलमध्ये एक कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने ...

Oxygen plant now when not needed | गरज नसताना आता ऑक्सिजन प्लांट

गरज नसताना आता ऑक्सिजन प्लांट

औरंगाबाद : मेल्ट्रॉन येथील कोविड हॉस्पिटलमध्ये एक कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. आता कंत्राटदारासोबत अंतिम वाटाघाटी सुरू आहे. सध्या करोनाचे रुग्ण नसल्यामुळे ऑक्सिजन प्लांटची अजिबात गरज नाही. अवघ्या दोन हजार रुपयांच्या सिलिंडरवर सध्या काम सुरू आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात जास्त होती. दररोज तीनशेपेक्षा जास्त बाधित आढळून येत होते. याच काळात शहरात ऑक्सिजन बेडस् उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत होती. रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडची गरज लक्षात घेऊन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारण्याची घोषणा केली. या कोविड केअर सेंटरमध्ये तीनशे खाटांची व्यवस्था आहे. त्यापैकी सध्या पन्नास खाटांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारला, तर २५० खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले. ऑक्सिजन प्लांटसाठीचा निधी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येईल, अशी घोषणादेखील करण्यात आली व महापालिकेला प्लांटसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेने ऑक्सिजन प्लांटसाठी निविदा प्रक्रिया केली. एका एजन्सीची सुमारे दहा टक्के जादा दराची निविदादेखील मंजूर केली. त्या एजन्सीला केवळ कार्यारंभ आदेश देणे आता बाकी आहे. जिल्हा प्रशासनाकडून निधी प्राप्त न झाल्यामुळे कार्यारंभ आदेश राखून ठेवण्यात आला. एजन्सीने दर कमी करावेत, असे सांगितले जात आहे; पण एजन्सी आपल्या दरावर ठाम आहे. घाटी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. महापालिकेला सध्या एक कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरजही नाही, हे विशेष.

Web Title: Oxygen plant now when not needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.