जातीय समीकरणावर मात

By Admin | Updated: May 18, 2014 00:27 IST2014-05-18T00:26:27+5:302014-05-18T00:27:40+5:30

हिंगोली : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्टÑवादी- पीरिपा आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी आपल्या मितभाषी स्वभावाने दिग्गजांनी मांडलेल्या जातीय समीकरणावर मात करीत विजय खेचून आणला.

Overcoming Ethnic Equilibrium | जातीय समीकरणावर मात

जातीय समीकरणावर मात

हिंगोली : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्टÑवादी- पीरिपा आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांनी आपल्या मितभाषी स्वभावाने दिग्गजांनी मांडलेल्या जातीय समीकरणावर मात करीत विजय खेचून आणला. पाच विधानसभा मतदारसंघात सातव यांना बर्‍यापैकी मते मिळाली तर स्वत:च्या विधानसभा मतदार संघातील मतदारांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम करीत निर्णायक मतांची आघाडी दिली. या आघाडीनेच अन्य ठिकाणी झालेली त्यांची पिछाडी भरून निघाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही नेते मंडळींकडून जातीय समिकरणे मांडली जावून सातव यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये त्यांच्या स्व: पक्षातील काँग्रेसच्या काही नेतेमंडळींसह राष्टÑवादीतील काही नेतेमंडळींचाही समावेश होता. शिवाय शिवसेनेतील काही नेतेमंडळींनीही या प्रयत्नाना साथ देण्याची कुठलीही कसर ठेवली नाही. लोकसभा मतदार संघात मराठा विरुद्ध इतर समाज असे चित्र रंगविण्याचाही केविलवाणा प्रयत्न या नेते मंडळींनी केला; परंतु मतदारांनी मात्र काही नेत्यांचे हे प्रयत्न हाणून पाडले व निवडणुकीच्या राजकारणात कोणताही समाज एका विशिष्ट उमेदवाराशी बांधिल नाही, हेच या निकालामधून दाखवून दिले. सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेस- राष्टÑवादीचे आमदार असताना सातव यांना आघाडी मात्र केवळ काँग्रेसच्या उमरखेड, राष्टÑवादीच्या किनवट व स्वत: आ. सातव यांच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून मिळाली. हिंगोली, हदगाव व वसमत विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी मिळेल, अशी काँग्रेस जणांना अपेक्षा होती; परंतु ही अपेक्षा फोल ठरली. या मतदार संघांमधून सातव यांना का आघाडी मिळाली नाही? यावर काँग्रेस व राष्टÑवादीची पक्षश्रेष्ठी चर्चा करणार असली तरी आज घडीला हे तिन्ही मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले झाले आहेत की काय? असेच चित्र निर्माण झाल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. राहुल गांधी यांची सभा निर्णायक काँग्रेस- राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची १४ एप्रिल रोजी हिंगोली येथे झालेली जाहीर सभा निर्णायक ठरली. त्यांच्या सभेसाठी जवळपास २ लाखांचा जनसमुदाय हिंगोलीत जमला होता. राहुल गांधी हे पुण्याहून विशेष विमानाने नांदेडला येणार होते; परंतु त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते सभेसाठी हिंगोलीत पोहोचणार की नाही? अशी चर्चा सुरू होती. सायंकाळचे ५ वाजत आले तरी राहुल गांधी येत नसल्याने सेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. सायंकाळी ५ वाजता राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर त्यांची झालेली सभा सातव यांच्यासाठी निर्णायक ठरली. मतभेदाचा वानखेडे यांना फटका शिवसेनेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुभाष वानखेडे व माजी आ. गजाननराव घुगे, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्यामध्ये निर्माण झालेले मतभेद शेवटपर्यंत कायम राहिले. अशातच वानखेडे यांनी ‘मातोश्री’वर ताकद दाखवून कळमनुरी, वसमत व औंढा नागनाथ या तीन तालुक्याची तालुका कार्यकारिणी बदलली. या नाराजीचाही त्यांना फटका सहन करावा लागला. जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता असतानाही वानखेडे यांनी जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या अनेक निर्णयांना जाहीरपणे विरोध दर्शविला. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांनी घेतलेले निर्णय मागे घेण्यास त्यांनी भाग पाडले. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांनी प्रारंभीपासूनच वानखेडे यांना असहकार्याचे धोरण कायम ठेवले. शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांना बदलण्यात आले. त्यामुळे नाराजांची नाराजी दुर करण्याऐवजी त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला. याचा फटका वानखेडे यांना सहन करावा लागला. दिग्गजांनी घेतल्या प्रचार सभा लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, उद्योग मंत्री नारायण राणे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्टÑवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, समाजकल्याणमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व प्रशासनमंत्री मनोहर नाईक, पशुसंवर्धनमंत्री मधुकर चव्हाण, राज्यमंत्री डी.पी. सावंत, सतेज पाटील, खा. हुसेन दलवाई आदी मान्यवरांनी जाहीर सभा घेतल्या. त्याचाही सातव यांना चांगलाच फायदा झाला. उद्धव ठाकरे यांच्या सभेची गर्दी कॅश करण्यात अपयश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ हिंगोलीत जोरदार सभा झाली होती. या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता. या सभेला झालेली गर्दी कॅश करण्यात वानखेडे यांना यश आले नाही. वानखेडे यांच्यासाठी आ. दिवाकर रावते, रामदास कदम, आ. नीलम गोºहे आदींनी जाहीर सभा घेतल्या; परंतु भाजपाच्या एकाही मोठ्या नेत्याची हिंगोलीत सभा झाली नाही, या मागचे गमक मात्र कळू शकले नाही. त्यामुळे भाजपाचे काही कार्यकर्ते शेवटपर्यंत संभ्रमात राहिले. याचाही फटका वानखेडे यांना बसल्याचे दिसून आले. संपूर्ण प्रचारादरम्यान वानखेडे यांनी विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्याऐवजी राजीव सातव यांच्यावर वैयक्तिक टीकेची झोड उठविली. पाच वर्षांत केलेली विकासकामे सांगताना त्यांची दमछाक झाली. याचाही नकारात्मक संदेश मतदारांमध्ये गेला. वैयक्तिक मतभेदांना थारा नाही या लोकसभा निवडणुकीत केवळ वैयक्तिक मतभेदातून आघाडीच्या काही नेत्यांनी राजीव सातव यांना पराभूत करण्यांचा चंग बांधला; परंतु सातव यांनी मतदारांच्या जोरावर या नेत्यांच्या वैयक्तिक मतभेदावर मात करीत विजयी पताका फडकाविली.

Web Title: Overcoming Ethnic Equilibrium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.