छत्रपती संभाजीनगर/परभणी : कलाकारांची खाण असलेल्या मराठवाड्याच्या मातीतून एक नवा, प्रतिभावान कलाकार झपाट्याने पुढे येत आहे. परभणी येथील आर्यन पाटोळे या युवा गायक, संगीतकार, अभिनेता आणि कवीने आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'नाद लागला' या गीताने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करत वर आलेल्या आर्यनच्या या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
संघर्षातून साकारलेला कलाकारआई घरकाम करते आणि वडील मजुरी करतात, अशा कठीण परिस्थितीत आर्यन पाटोळे यांनी आपली संगीताची आवड जोपासली. बालपणी इयत्ता सातवीत असताना त्यांनी पहिल्यांदा तबला शिकला आणि त्यानंतर विविध तालवाद्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. ड्रम, बेंजो यांसारख्या वाद्यांवर त्यांची पकड आहे. परभणी येथे शिक्षण घेऊन त्यांनी आपले संगीत क्षेत्रातील स्थान सिद्ध केले आहे.
'नाद लागला'ची वेगळी ओळखआर्यन पाटोळे यांचे नुकतेच रिलीज झालेले 'नाद लागला' हे गीत सध्या प्रचंड गाजत आहे. "तिच्यापायी सातबारा झालाय कोरा, पण तरीही तो म्हणतोय तुझ्या इश्काचा 'नाद लागला'" असे या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर या गीताने मोठा विक्रम केला आहे. यूट्यूबवर ७ लाख २० हजारांहून अधिक तर इन्स्टाग्रामवर टीजरला २ लाखांपेक्षा अधिक आणि गीताला १४ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यावर शेकडो रील्स देखील बनल्या आहेत. तसेच गणेशोत्सव मिरवणुका आणि नवरात्रीच्या दांडियामध्येही या मराठी गाण्यावर अनेकांनी ठेका धरला. या गीताची विशेष बाब म्हणजे याचे गीतकार, संगीतकार आणि अभिनेता स्वतः आर्यन पाटोळे आहेत.
वाद्यांचा 'नाद' आणि अभिनव प्रयोग'नाद लागला' या गीतामध्ये आर्यन यांनी केलेला वाद्यांचा प्रयोग हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी अरेबिक (डमरू/Darbuka), आफ्रिकन (डझेम्बे/Djembe), राजस्थानी (साज/Saz) आणि भारतीय लोकसंगीतातील हळगी, डफ, संभळ, तुतारी, सनई यांसारख्या जवळपास २० हून अधिक प्रकारच्या वाद्यांचे मिश्रण केले आहे. पाश्चात्य वाद्यांसह अनेक तंतुवाद्यांचाही यात समावेश आहे. या अभिनव प्रयोगामुळे हे गीत श्रोत्यांना एक वेगळा अनुभव देत आहे.
मराठवाड्यात मोठी प्रतिभाआजवर आर्यन पाटोळे यांनी १००० हून अधिक गीते सादर केली आहेत. यासोबतच त्यांची 'वासूदेव आला' (यात अविनाश नारकर यांनी काम केले होते), 'बस तुझे प्यार है', 'तूम बिन' यांसारखी गाणी लोकप्रिय आहेत. शाहीद माल्या आणि आनंद शिंदे यांसारख्या प्रसिद्ध गायकांनीही त्यांच्या काही गीतांना आवाज दिला आहे. 'नाद लागला' या गीताचे चित्रीकरण आणि संपादन काम परभणी येथेच झाले आहे. परभणीसह मराठवाड्यातील युवा कलाकारांना घेऊन यापुढेही काम करत राहण्याचा मानस आर्यन पाटोळे यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्याच्या मातीतील ही प्रतिभा भविष्यात 'नवा सुपरस्टार' म्हणून उदयास येईल, असा विश्वास संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे.
Web Summary : Aryan Patole's 'Naad Lagla' is a hit! Despite hardships, Aryan's musical talent shines through innovative sounds. The song uses 20+ instruments and has gained massive views on YouTube and Instagram, resonating across Maharashtra.
Web Summary : आर्यन पाटोले का गाना 'नाद लागला' हिट हो गया! कठिनाइयों के बावजूद, आर्यन की संगीत प्रतिभा नवीन ध्वनियों के माध्यम से चमकती है। गाने ने YouTube और Instagram पर लाखों व्यूज बटोरे और महाराष्ट्र में गूंज रहा है।