बहिरट यांनी काढले लाखोंचे उत्पन्न
By Admin | Updated: July 1, 2014 01:06 IST2014-07-01T00:45:17+5:302014-07-01T01:06:11+5:30
पांडुरंग खराबे , मंठा तालुक्यातील आर्डा (खारी) येथील अल्पभूधारक शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेऊन कमी खर्चात लाखो रुपये उत्पादन काढून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला.

बहिरट यांनी काढले लाखोंचे उत्पन्न
पांडुरंग खराबे , मंठा
तालुक्यातील आर्डा (खारी) येथील अल्पभूधारक शेतीमध्ये टरबूज, काकडी, सिमला मिरची, डाळिंब, द्राक्ष, पपई, सोयाबीन, मका, पेरू अशी विविध प्रकारचे उत्पादन घेऊन कमी खर्चात लाखो रुपये उत्पादन काढून कृषी क्षेत्रात आदर्श निर्माण केला. त्यांच्या शेतीमधील पिकाची पाहणी व माहिती घेण्यासाठी दूरवरून शेतकरी येत आहेत. तर ते स्वत:च गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना उत्पादनवाढीचे धडे देत आहेत.
यावर्षी उन्हाळ्यात विठ्ठलराव बहीर यांनी २० गुंठे शुगरक्वीन शींजरा जातीचे टरबूज लावून सुमारे ७० दिवसात एक लाख पन्नास हजाराचे उत्पादन मिळविले. त्यासाठी त्यांनी केवळ ४५ हजार रुपये खर्च केला होता. निव्वळ नफा १ लाख ५ हजार रुपये झाला. तर २० गुंठे शेतीमध्ये जून २०१३ ला सिमला मिरचीची लागवड केली. त्यासाठी त्यांना २ लाख पन्नास हजार खर्च आला. आणि उत्पादन ७ लाख पन्नास हजार रुपयाचे आले. निव्वळ नफा ५ लाख रुपये राहिला. सप्टे. २०१३ मध्ये २० गुंठ्यामध्ये तायवान जातीच्या पपईची लागवड केली. आतापर्यंत ५ टन उत्पन्न निघाले आणखी ५ टन निघेल. रमजानमुळे भाव बरा मिळणार, यात शंका नसल्याचे ते म्हणाले. पपईमधून ८५ हजाराचे उत्पादन तर २५ हजार खर्च झाला. त्याचप्रमाणे १ एकरमध्ये नोव्हे. २०१३ मध्ये भगवा जातीच्या डाळींबाची लागवड केली असून २५ हजार रुपये खर्च आला. उत्पादन येणे बाकी आहे. त्याचप्रमाणे त्यांनी लाखनो जातीचा पेरू लावला २०१३ पासून उत्पादन सुरू झाले. उत्पादन ४० हजार तर खर्च केवळ १२ हजार झाल्याचे प्रगत शेतकरी विठ्ठलराव बहिरट यांनी सांगितले.
यावर्षी १० गुंठे जमिनीत जानेवारी महिन्यात काकडीची लागवड केली. त्यामधून ४५ दिवसात १० हजार रुपयाचे उत्पादन झाले तर केवळ त्यासाठी २ हजार रुपये खर्च आला. आता एक एकरामध्ये आधुनिक पद्धतीने द्राक्ष लागवड केली असून, यामधून मोठे उत्पादन मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या शेतीच्या कामासाठी आणि उत्पादन वाढीसाठी त्यांचे अख्खे कुटुंब शेतात राबताना दिसते. त्यामध्ये पत्नी रुख्मीनीबाई, मुलगा शेषनारायण बहिरट, सतीश बहिरट, रामू बहिरट, सुना, नातवंडे सर्वांनाच शेती कामात रस आहे, हे विशेष.
कृषी विभागाकडून नियमित मार्गदर्शन
या प्रगत शेतकऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाहणीसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त दांगट, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एस. बरदाळे, आ. सुरेशकुमार जेथलिया, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे, कृषी पुरस्कारप्राप्त उद्धवराव खेडेकर, प्रतिष्ठित व्यापारी रामेश्वर खराबे, कृउबा समितीचे संचालक काशिनाथराव बोराडे, पिन्टू भाबटसह अनेक शेतकऱ्यांनी भेट देवून शेतीची पाहणी केली.