१९० पैकी केवळ ५३ सौर कृषीपंपच झाले कार्यान्वित !
By Admin | Updated: January 1, 2017 23:36 IST2017-01-01T23:29:42+5:302017-01-01T23:36:12+5:30
उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली.

१९० पैकी केवळ ५३ सौर कृषीपंपच झाले कार्यान्वित !
उस्मानाबाद : भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, यासाठी शासनाने सौर कृषीपंप वाटप योजना सुरू केली. सदरील योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोला कृषीपंप वाटपाचे उद्दिष्ट आले होते. सर्व लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असली तरी ९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले अले तरी आजवर केवळ ५३ सोलापंपच कार्यान्वित होवू शकले. जवळपास वर्षभराचा कालावधी लोटत आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैसेही भरले आहेत. असे असतानाही २५ टक्यांच्या आसपासच सोलारपंप कार्यान्वित होवू शकल्याने ‘महावितरण’च्या कार्यापद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येवू लागले आहे.
मागील तीन-चार वर्षात जिल्हाभरातील शेकऱ्यांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. पाणीटंचाईमुळे शेतीव्यवसाय अक्षरश: मोडून पडला होता. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. अशा दुष्काळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने अनुदानावर सोलार कृषीपंप वाटप योजना सुरू केली. ज्यामुळे शेतकऱ्यांची भारनियमन आणि विद्युत बिलाच्या कटकटीतून मुक्तता होईल, अशी अपेक्षा होती. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी सुमारे १९० सोलारपंप पाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले.
त्यानुसार वीज कंपनीकडे सुमारे चारशेच्या आसपास अर्जही दाखल झाले. यापैकी सर्व निकषांमध्ये पात्र ठरलेल्या १९० शेतकऱ्यांची निवडही करण्यात आली. यापैकी १६५ जणांना कोटेशनही देण्यात आले असता ९९ जणांनी पैसे भरले. परंतु, वर्षभराचा कालावधी लोटत आला असतानाही आजवर केवळ ५३ सोलारपंपच कार्यान्वित केले आहेत. पैसे भरूनही ज्या लाभार्थ्यांचे सोलारपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, असे शेतकरी वीज कपंनीकडे चकरा मारीत आहेत. परंतु, अधिकारी सोयीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
सध्या प्रकल्पांसह विहिरी, कुपनलिकांना पाणी आहे. पिकांना पाणी देण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु, भारनियमन आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणी असूनही पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत लाभार्थी शेतकऱ्यांना सोलारपंप मोठा आधार ठरले असते. परंतु, दुर्दैवाने तसे झाले नाही. पैसे भरूनही संबंधित ज्या लाभार्थ्यांचे सोलार कृषीपंप कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.(प्रतिनिधी)