कडबा जिल्ह्याबाहेर
By Admin | Updated: March 24, 2016 00:52 IST2016-03-24T00:23:26+5:302016-03-24T00:52:12+5:30
राजेश खराडे , बीड जिल्ह्यावर चाराटंचाईचे संकट असताना दिवसाकाठी शेकडो मेट्रीक टन कडबा परजिल्ह्यात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. छावण्यांमध्ये कडब्याला उठाव नाही

कडबा जिल्ह्याबाहेर
राजेश खराडे , बीड
जिल्ह्यावर चाराटंचाईचे संकट असताना दिवसाकाठी शेकडो मेट्रीक टन कडबा परजिल्ह्यात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. छावण्यांमध्ये कडब्याला उठाव नाही. तसेच परजिल्ह्यात अधिकचा भाव मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील कडबा बाहेर जात आहे. याउलट छावणीचालकांनी कडब्याऐवजी ऊसाला प्राधान्य देत परजिल्ह्यातून ऊसाची आवक सुरू केली आहे.
रबी हंगामातून जवळपास ३ लाख ८३ हजार २६० मे.टन कडबा उपलब्ध झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने आपसूकच कडब्याचे दर सुरुवातीपासूनच कडाडले होते. २२०० रुपये शेकडा कडबा छावणीवर परवडत नसल्याने छावणी चालकही कडब्यापेक्षा उसालाच अधिकची पसंती देत आहेत. रबी हंगाम होऊन वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात २ लाख २२ हजार १८६ मे.टन चारा उपलब्ध आहे. त्यामुळे २० दिवसांच्या कालावधीत १ लाख ६१ हजार मे. टन चारा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्ह्याच्या तुलनेत परिसरातील सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना जिल्ह्यांतील छावण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शेकडा दर २२०० ते २५०० रुपये असे कडब्याचे दर झाले आहेत. छावण्यांची संख्या अधिक असल्याने सध्या तरी शेतकऱ्यांना चाऱ्याची टंचाई जाणवत नाही. हाती लागलेल्या कडब्यातून उत्पादन घेण्याच्या हेतूने शेतकरी इतर जिल्ह्यात, तेही अधिकच्या दराने कडब्याची विक्री करीत आहेत. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्याबाहेरील कडबा विक्रीला बंदी आहे. मात्र सोलापूर, औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या ट्रक कडब्याची वाहतूक करीत असताना दिसत आहेत.
जिल्ह्यात २४० पेक्षा अधिक छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास सव्वादोन ते अडीच लाख लहान-मोठ्या जनावरे आश्रय घेत आहेत. जिल्ह्यात ८ लाख ९३५ जनावरे असून, छावणीमुळे चाऱ्याचा भार शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कमी झाला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत रबीची काढणी झाली होती. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ३ लाख ८३ हजार २०७ मे. टन चारा उपलब्ध असल्याची शासन दरबारी नोंद करण्यात आली होती. १९ मार्चपर्यंत हीच नोंद २ लाख २२ हजार १८६ मे.टनावर आली होती. त्यामुळे २० दिवसांत १ लाख ६१ हजार मे. टन चाऱ्याचे गौडबंगाल कायम आहे.
रबी हंगाम पूर्ण होऊन शेतकरी गंजी न लावता थेट व्यापाऱ्यांना बांधावर बोलावत आहेत. सद्य:स्थितीला छावण्यांमुळे शेतकऱ्यांना आधार मिळत असला तरी जिल्ह्यातील चाऱ्याची जिल्ह्यात खरेदी-विक्री करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
४मात्र, याकरिता या आदेशाच्या अंमलबजावणीकरिता नेमलेले पथक केवळ कागदोपत्रीच दिसून येत आहे. त्यामुळे खुले आम चाऱ्याची परजिल्ह्यात विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.