आमची स्वतंत्र ‘आयडेंटिटी’
By Admin | Updated: June 22, 2014 00:48 IST2014-06-22T00:47:06+5:302014-06-22T00:48:37+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचाही चेहरा पुढे करून मते मागणार नाही. गेल्या साठ वर्षांत आम्ही कधीही चेहरा दिला नाही व पुढेही देणार नाही.

आमची स्वतंत्र ‘आयडेंटिटी’
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचाही चेहरा पुढे करून मते मागणार नाही. गेल्या साठ वर्षांत आम्ही कधीही चेहरा दिला नाही व पुढेही देणार नाही. कुणाचे अनुकरण करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे स्वतंत्र अस्तित्व व ओळख आहे, असे रोखठोक मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नेत्या व खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांसाठी आयोजित सोशल मीडिया कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी खा. सुळे शहरात आल्या होत्या. कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, देशाला उत्तरदायी नेता हवा होता. तो मतदारांनी शोधला. परंतु आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी असा कोणताही चेहरा पुढे करणार नाही. शरद पवार यांनी त्यांचे राजकारण नेहमी चांगला सामाजिक बदल, गुणात्मक विकास कामे व सुशासन या त्रिसूत्रीनुसार केले आहे. यापुढेही याच मार्गाने आम्ही जाणार आहोत.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्याचे टाळत अत्यंत सावध व मोजकेच वक्तव्य त्या करीत होत्या. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अंगुलीनिर्देश करून देण्याचे टाळलेच.
आघाडीत नव्या मित्रांची गरज आहे काय, रेल्वे दरवाढ अटळ होती काय, आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र काय राहील आदी अनेक प्रश्नांवर त्या स्पष्ट बोलल्या नाहीत. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, नीलेश राऊत, एकनाथ गवळी, संदेश कांबळे आदींची उपस्थिती होती.
हिना गावित सुसंस्कृत मुलगी
राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा झाला काय, असे विचारता खा. सुळे म्हणाल्या, महिला बचत गट व राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहत नाहीत. त्यामुळेच हिना गावितांनी पक्ष सोडला काय असे विचारता, त्या म्हणाल्या नंदुरबार मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, त्यामुळे हिनाला तेथून संधी देणे शक्य नव्हते. हिना गावित ही सुसंस्कृत मुलगी आहे. तिला माझ्या कायम शुभेच्छा राहतील.
महिला मुख्यमंत्र्यांनी महिलांचे किती प्रश्न सोडविले
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे, असे विचारता त्या म्हणाल्या, मी दिल्लीत रमले आहे व मला तेथेच राहायचे आहे. अनेक राज्यांत महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महिलांचे किती प्रश्न सोडविले हा संशोधनाचा विषय आहे.