फूड पार्क प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली : हरसिमरत कौर बादल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 14:47 IST2018-11-15T14:45:46+5:302018-11-15T14:47:15+5:30
फूड पार्क प्रकल्प युपीए सरकारच्या काळात केवळ प्रस्तावित करण्यात आले, कागदावर असणाऱ्या या प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली आहे.

फूड पार्क प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली : हरसिमरत कौर बादल
औरंगाबाद : फूड पार्क प्रकल्प युपीए सरकारच्या काळात केवळ प्रस्तावित करण्यात आले, कागदावर असणाऱ्या या प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली आहे. देशभरातील फूड पार्कमुळे हजारोंना रोजगार मिळाले असून याच्या उभारणीत कर्जासाठी 2000 कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली. त्या पैठण येथील मेगा फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
अन्न प्रक्रिया उद्योगातील पैठण मेगा फूड पार्कचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते आज दुपारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, आज रोजगाराच्या सर्वात जास्त संधी अन्न प्रक्रिया उद्योगात आहेत. दुध उत्पादनात देश जगात एक क्रमांकावर आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांना उपाशी राहावे लागते. याचे कारण म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग नसल्याने हजारो टन अन्न खराब होत आहे. यामुळे फूड पार्क उभारण्याकडे सरकारचे लक्ष आहे. मागील सरकारने फूड पार्क प्रकल्प केवळ कागदावर ठेवली आम्ही त्यांना गती देत देशभरात याची उभारणी करत आहोत असेही त्या म्हणाल्या.
देशभरात फूड पार्कचे जाळे
युपीए सरकारने 42 फूड पार्क प्रस्तावित केले पण पूर्ण नाही केले नाहीत. आम्ही 2014 ते 2018 पर्यंत 15 पार्क सुरु केले असून 2019 पर्यंत आणखी 15 पार्क सुरु करू अशी माहितीही बादल यांनी दिली. यासोबतच कॉल्डचेनची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी 6000 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फूड पार्क मध्ये अनेक उद्योगांना संधी आहेत. उद्योगांना कर्ज पुरवठ्यासाठी 2000 कोटीची तरतूद मंत्रालयाने केली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. तसेच महाराष्ट्र राज्यात येत्या काळात 109 फूड प्रोजेक्ट, 55 कोल्ड स्टोरेज, 3 मेगा फूड पार्क सुरु करणार. अन्न प्रक्रियेसाठी 10000 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहितीही बादल यांनी दिली.