\आमचे मोर्चे फक्त समतेसाठीच...
By Admin | Updated: November 5, 2016 01:41 IST2016-11-05T01:25:47+5:302016-11-05T01:41:58+5:30
औरंगाबाद : आमचे मोर्चे जातीसाठी वा मातीसाठी नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा टोला बहुजन

\आमचे मोर्चे फक्त समतेसाठीच...
औरंगाबाद : आमचे मोर्चे जातीसाठी वा मातीसाठी नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समता प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा टोला बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या समारोपप्रसंगी केलेल्या भाषणात अपूर्वा दांडगे हिने मारला. तर शाहीन शेख या मुलीने ‘दलित- मुस्लिम भाई - भाई असल्याचा निर्वाळा देऊन आज मुस्लिम समाजाची अवस्था दलित समाजापेक्षाही बिकट होत चालली आहे, याकडे कोण लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला.
या दोन्ही मुलींची भाषणे जोरदार झाली. त्यांना लाखो मोर्चेकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जागोजाग टाळ्यांचा कडकडाट होत गेला आणि अत्यंत आत्मविश्वासाने या मुलींनी आपले मुद्दे मांडले. प्रतीक्षा वाकेकर, मयुरी दाभाडे, मनीषा वाघमारे या मुलींनीही यावेळी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
अपूर्वा दांडगे हिने सवाल उपस्थित केला की, अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरुद्ध मराठा समाजच त्वेषाने का उठला? कोपर्डी प्रकरणाचे कुणीही समर्थन केले नाही. करणार नाही, पण क्षणोक्षणी दलितांवर अन्याय- अत्याचार होत असताना हे कुठे असतात?
या मुलीने शरद पवार यांच्यावरही घणाघाती टीका केली. अॅट्रॉसिटी कायदा बदलला पाहिजे, ही मागणी शरद पवार यांनी केली आणि हे मराठा क्रांती मोर्चे निघायला लागले. या मोर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसनेच ताकद दिली, असा आरोप अपूर्वाने केला. अॅट्रॉसिटीचा वापर कसा करावा हे ज्यांना कळत नाही, ते गैरवापर कसा करू शकतील? ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी राब राब राबावे लागते, तो दलित, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर काय अॅट्रॉसिटीचा गैरवापर करील? असे प्रश्न तिने उपस्थित केले व जात दांडगेच अन्याय- अत्याचार करून मोकाट फिरतात याकडे लक्ष वेधले. अॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक का व्हायला पाहिजे, याची अनेक उदाहरणे तिने दिलीे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्याची रिंगटोन वाजवता म्हणून खून होत असतील तर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करून यांना काय खुली मोकळीक द्यायची का, असा खडा सवाल तिने उपस्थित केला व आव्हान दिले की, तुम्ही तुमचा विकास करा व आम्ही आमचा विकास करतो, बघू या कोण पुढे जाते ते!
मुख्य मोर्चास क्रांतीचौकातून सुरुवात झाली. येथे ठिकठिकाणाहून लहान लहान मोर्चे आले. ते घोषणा देत होते. परंतु क्रांतीचौकात येताच प्रत्येकांनी घोषणा बंद करून मूक मोर्चाचे आवाहन पाळले. महिलांना मोर्चात अग्रस्थानी जाण्यासाठी युवकांनी विशेष रस्ता तयार ठेवला होता. आपल्या महिन्या, दोन महिन्याच्या बाळांसह मोर्चात आलेल्या महिलांना त्यामुळे सुविधा झाली. आमखास मैदानापर्यंत सर्वांनीच अमाप शिस्तीचे दर्शन घडविले. शेवटी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांनी स्वागत केले.
क्रांतीचौकातून निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शहरातील सर्वच वसाहतींमधून लहान लहान मोर्चे निघाले. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यावर सकाळी मोर्चे दिसत होते. वाहतूक थांबवून पोलीस या मोर्चेकऱ्यास वाट करून देत होते. त्यामुळे अवघे शहर ठप्प झाल्यागत वाटत होते.
मोर्चा मार्गावर बघ्यांची गर्दी
शहराने प्रथमच अतिविशाल मोर्चा पाहिला. क्रांतीचौक ते आमखास मैदानापर्यंत रस्त्यांवर गर्दीच गर्दी होती. हा मोर्चा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अन्य नागरिकांनी गर्दी केली होती. मोर्चाचे क्षण मोबाईलमध्ये टिपले जात होते. मुंबईहून सहा तरुण-तरुणींचे कलापथक मोर्चात आले होते. नाशिकच्या घटनेनंतर तेथील दलितांवर झालेल्या अत्याचाराची व तेथील भयावह परिस्थितीची पुस्तके त्यांनी वाटली. तसेच रस्त्याने क्रांती गीतेही सादर केली.