कुलसचिवांची मूळ नियुक्ती चुकीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:08 IST2019-05-21T23:07:54+5:302019-05-21T23:08:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव तथा विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची मूळ सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. शोभना जोशी यांनी तक्रार निवारण समितीकडे केली आहे.

कुलसचिवांची मूळ नियुक्ती चुकीची
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव तथा विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची मूळ सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. शोभना जोशी यांनी तक्रार निवारण समितीकडे केली आहे.
विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती अध्यक्षाच्या नावाने डॉ. जोशी यांनी तक्रार दिली आहे. यात त्यांनी डॉ. पांडे यांची ३ नोव्हेंबर २००३ रोजी झालेली नियुक्ती चुकीची असल्यामुळे रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना देण्यात आले होते. निवेदनावर कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे डॉ. जोशी यांनी विद्यापीठातील तक्रार निवारण समितीकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली. या तक्रार अर्जासोबत त्यांचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्तीचा आदेश आदी जोडण्यात आले आहे. या तक्रारीत म्हटल्यानुसार सहयोगी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेला अध्यापनाचा अनुभव डॉ. पांडे यांच्या नियुक्तीच्या वेळी नव्हता, तसेच सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेले सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा पीएच.डी. त्यांनी पूर्ण केलेली नव्हती. त्यामुळे अध्यापनाचा अनुभव नसताना त्यांनी खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून विद्यापीठाची फसवणूक केली असल्याचेही यात म्हटले आहे. नियमबाह्यपणे नेमणूक केलेली असल्यामुळे ती तात्काळ रद्द करण्यात यावी, असेही तक्रारी म्हटले आहे.