‘कॅरिआॅन’ला विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:06 IST2017-08-10T00:06:43+5:302017-08-10T00:06:43+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कॅरिआॅनसंदर्भात बैठक घेण्यात आली.

‘कॅरिआॅन’ला विरोधच
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची कॅरिआॅनसंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्राचार्यांसह अधिष्ठातांची मते जाणून घेतली. यात बहुतांश प्राचार्यांनी कॅरिआॅनच्या विरोधात मत मांडले आहेत.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाची पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रथम वर्षासाठी संलग्नता घेतली आहे. ही महाविद्यालये पुढील वर्षी द्वितीय वर्षासाठी संलग्न होतील तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न; परंतु प्रथम वर्षाला नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यातून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन देण्याची मागणी समोर आली आहे. यासाठी विविध संघटनांनी विद्यापीठात आंदोलने केली. यावर निर्णय घेण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक मंगळवारी सायंकाळी घेतली. या बैठकीत विविध प्राचार्यांनी कॅरिआॅनला विरोधच केला. दोन-तीन प्राचार्यांनी कॅरिआॅन देणे योग्य राहील असे मत मांडले; मात्र २०१३ साली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने यापुढे कॅरिआॅन देण्यात येणार नाही, असा ठराव मंजूर केला होता. २०१२ साली विद्यापीठाने कॅरिआॅन दिल्यानंतर एका विद्यार्थ्याचे किमान ४०-४० विषय मागे राहिले होते. या विषयात विद्यार्थी शेवटपर्यंत उत्तीर्णच झाले नाहीत. मग विद्यार्थी उत्तीर्णच होत नसतील तर त्यांना पुढील वर्गात कशाला पाठवायचे, असा सवालही बैठकीत उपस्थित झाला. राज्य सरकारनेही विद्यार्थी उत्तीर्ण झाला तरच पुढील वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयांतील किमान ८० टक्के विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती मिळतात. या विद्यार्थ्यांना कॅरिआॅन दिल्यास राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळणार नसल्याचेही बैठकीत समोर आले. मागील वेळा कॅरिआॅन दिल्याचा फायदा केवळ एक ते दोन टक्के विद्यार्थ्यांनाच झाला असल्याचे काहींनी स्पष्ट केले.