कत्तलखान्याला विरोध कायमच
By Admin | Updated: June 2, 2014 01:04 IST2014-06-02T00:59:46+5:302014-06-02T01:04:28+5:30
नांदेड : कत्तलखान्याला विरोध ही शिवसेनेची भूमिका असून यात आ़ओमप्रकाश पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी पत्रपरिषदेत केला़

कत्तलखान्याला विरोध कायमच
नांदेड : शहरात उभारण्यात येणार्या कत्तलखान्याला विरोध ही शिवसेनेची भूमिका असून या कत्तलखान्यात आ़ओमप्रकाश पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी पत्रपरिषदेत केला़ तसेच विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे बिथरलेल्या पोकर्णा यांनी माझ्यावर दहा कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याचे ते म्हणाले़ आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी हेमंत पाटील यांच्यावर नुकतेच दहा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे़ त्यानंतर पाटील यांनी रविवारी पत्रपरिषद घेवून आ़पोकर्णा व त्यांच्या पुत्रावर टिका केली़ ते म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या कत्तलखान्यातील रक्ताचे पाट हे गोदावरीत मिसळत आहेत़ तर दुसरीकडे कत्तलखान्यामुळे गोमातेची कत्तल होणार आहे़ त्यामुळे या कत्तलखान्याला शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध आहे़ या कत्तलखान्यात आ़पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचे अनेक पुरावे त्यांनी दिले़ तसेच खुद्द पोकर्णा यांनीच ही मालमत्ता विकत घेतली असल्याचे न्यायालयासमोर सादर केल्याचे पाटील म्हणाले़ कत्तलखान्याच्या विरोधात पशू हत्या विरोधी नागरी समितीने काढलेल्या मोर्चाला नऊ महिने लोटले आहेत़ त्यात या संबधात चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीस समितीनेही दिलेला अहवालही कत्तलखान्याच्या विरोधात आहे़ असे असताना आता माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणे हास्यास्पद आहे़ जमिनीचे व्यवहार करताना ४२ लाखांची मुद्रांक माफी मिळावी म्हणूनही बराच घोळ घालण्यात आला़ त्यांच्या कुटुंबातील सदस्यही राशन धान्य माफीया, गुटखा माफीया, जमीन माफीया असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे़ तसेच न्यायालयाचा आपण आदर करीत असून आता माझ्या नावावर असलेल्या मालमत्तेतून दहा लाख रुपयेही मिळणार नाहीत़ तरी पण पोकर्णा जर निर्दोष असतील तर राजकारणातून सन्यास घेवून रेल्वेस्टेशनवर बुट पॉलीश करुन त्यांनी दाखल केलेल्या दाव्याची रक्कम भरु असेही पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी विरोधी पक्ष नेता दीपकसिंह रावत, प्रविण जेठेवाड, पप्पू जाधव, तुलजेश यादव, बंडू खेडकर, उमेश मुंडे, अशोक उमरेकर यांची उपस्थिती होती़