औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडा, पर्यटन विकास फाऊंडेशनची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 19:46 IST2021-06-08T19:45:33+5:302021-06-08T19:46:32+5:30
औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत.

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडा, पर्यटन विकास फाऊंडेशनची मागणी
औरंगाबाद : काेराेनाची साथ आल्यापासून राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन उद्योग बंद आहे. त्यामुळे पूर्ण उद्योगच उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे अनलॉक करण्यात येत असताना पर्यटनस्थळेही उघडण्यात यावीत, अशी मागणी औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे पर्यटन विभागाचे सचिव वल्सा नायर सिंग यांना दिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
औरंगाबाद पर्यटन विकास फाऊंडेशनतर्फे सुनीत कोठारी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, औरंगाबाद शहरात असलेल्या पर्यटन स्थळांवर कोविडच्या नियमांचे पालन करण्यासाठी उच्चस्तरीय नियमांचे बंधन घालून, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या अटीवर ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. कोविड आल्यापासून पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. मागील वर्षभरापासून औरंगाबादकडे परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे. या शिवाय देेशातील इतरही पर्यटकांनी येणे टाळले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, वाहतूक करणारे, मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजंट, ड्रायव्हर, पर्यटन स्थळी असलेेले दुकानदार, विविध वस्तू तयार करणारे कलाकार, महामार्गावरील रेस्टॉरंटसह इतर ठिकाणचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे शेकडो लोकांचा रोजगारही हिरावलेला आहे. तो पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटनस्थळे उघडावी लागणार आहेत.
शहरासह जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, ५० हजार वर्षांपूर्वीचे असलेले लोणार सरोवर आदी पर्यटनस्थळांना पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. त्यांना येण्यासाठी ही पर्यटनस्थळे उघडण्यात यावीत. अनलॉकच्या प्रक्रियेत विमान सेवा, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, शॉप, ऑफिस, उद्योग, सिनेमागृहे उघडण्यात येत आहेत. हे स्तुत्य आहे. त्याचप्रमाणे पर्यटन स्थळे उघडल्यास पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असेही या पत्रात म्हटले आहे.