रुग्णालयांची ओपीडी ठप्प, डॉक्टरांची जोरदार निदर्शने; बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल
By संतोष हिरेमठ | Updated: August 17, 2024 11:19 IST2024-08-17T11:18:15+5:302024-08-17T11:19:57+5:30
ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील.

रुग्णालयांची ओपीडी ठप्प, डॉक्टरांची जोरदार निदर्शने; बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल
छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय व्यवसायीकांनी आज देशव्यापी बंद पुकारला असून, यात शहरातील डॉक्टरही सहभागी झाले आहे. यामुळे ओपीडी सेवा ठप्प झाली असून ‘आयएमए’च्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर बंदमध्ये सहभागी झाले आहे. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे हाल होताना दिसत आहे.
९ ऑगस्ट २०२४ च्या पहाटे कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर पदवीधर तरुणीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यामुळे डॉक्टर्सच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कोलकाता येथील आरजीकार मेडिकल कॉलेजमधील स्री निवासी डॉक्टरवर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी १७.८.२०२४ रोजी निषेधदिन पाळून सकाळी ६ वाजेपासून ते रविवार १८.८.२०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच्या (ॲलोपॅथी) देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या आहेत.
बंद दरम्यान, अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. परंतु नियमित ओपीडी कार्य बंद आहे आणि वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील.
क्रांती चौकात डॉक्टरांची निदर्शने
छत्रपती संभाजीनगरमध्ये खाजगी डॉक्टरांचा एक दिवसीय संप सुरू झाला आहे. कोलकात्यातील घटनेचा तीव्र निषेध करत क्रांती चौकात डॉक्टरांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. पीडितेला न्याय आणि देशभरातील डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्याची मागणी डॉक्टरनी केली आहे. क्रांती चौक देत आयएमए हॉलपर्यंत आंदोलक मोर्चा काढणार आहेत.