तरच टिकेल शेतकरी..!
By Admin | Updated: July 1, 2014 00:11 IST2014-06-30T23:46:41+5:302014-07-01T00:11:50+5:30
प्रसाद आर्वीकर, परभणी बदलत जाणारे हवामान, वाढलेली महागाई आणि खते, बियाणांसाठी होणारी धावपळ या सर्व बाबींमुळे शेती आश्वासक राहिली नाही. मागील काही वर्षांत शेतीत अनेक प्रयोग झाले.
तरच टिकेल शेतकरी..!
प्रसाद आर्वीकर, परभणी
बदलत जाणारे हवामान, वाढलेली महागाई आणि खते, बियाणांसाठी होणारी धावपळ या सर्व बाबींमुळे शेती आश्वासक राहिली नाही. मागील काही वर्षांत शेतीत अनेक प्रयोग झाले. कमी क्षेत्रावर जास्त उत्पादन घेतले गेले, परंतु बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी हे बदल घडविले. त्यामुळे बदलते हवामान आणि नवे तंत्रज्ञान याची सांगड घालून शेती व्यवसाय शाश्वत व्हावा, यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे.
हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मोत्सव कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आजची शेती आणि उपलब्ध संधी याचा विचार केला तर शेतीविषयी उदासिनताच समोर येते.
शेतीत नवे तंत्रज्ञान येत आहे. कमी खर्चात, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन मिळविणारे वाण विकसित होत आहेत. परंतु निसर्ग साथ देत नाही. निसर्गाबरोबरच अनेक समस्या या क्षेत्रात आहेत. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे शेतमालाला बाजारमूल्य मिळते पण ते शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. शेतात पिकविण्यापासून ते बाजारात विकण्यापर्यंतचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारणे आज काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, हे सांगणे कठीण आहे. देश कृषीप्रधान देश असतानाही शेती व्यवसायाबाबत आश्वासकता अजूनही निर्माण झालेली नाही. व्यवसाय म्हणून शेतीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. या व्यवसायात आश्वासकता निर्माण करण्यासाठी आणि या माध्यमातून शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन, प्रशासनाला पावले उचलावे लागतील तेव्हाच शाश्वत शेतीची संकल्पना सत्यात उतरेल.
कापूस, सोयाबीन
ही मुख्य पिके
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकरी कापूस व सोयाबीन ही मुख्य पिके घेतात. त्या खालोखाल खरीप ज्वारी, तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. दोन ते तीन वर्षांपासून बीटी-१ व २ कपाशीवर लाल्याचा प्रादूर्भाव होत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला. त्या मानाने तेल बियाणे म्हणून ओळखले जाणाऱ्या सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना तारले. गतवर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या तरला.
खरीपाचे हेक्टर क्षेत्र
5,47,650
परभणी जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण ५ लाख ५० हजार ४०१ हेक्टर एवढे आहे. यंदा खरीप हंगामासाठी ५ लाख ४७ हजार ६५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र १ लाख ९० हजार हेक्टर एवढे आहे. सोयाबीन १ लाख ८० हजार हेक्टर, उडीद ८० हजार हेक्टर, भूईमूूग १०० हेक्टर, सूर्यफूल २०० हेक्टर, ऊस १५०० हेक्टर असे एकूण ५ लाख ४७ हजार ६५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने खरीप हंगामासाठी प्रस्तावित केले आहे.
स्व.वसंतराव नाईक हरितक्रांतीचे दूत
परभणी : माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राला प्राधान्य देत या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडविले. कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेता १ जुलै हा दिन कृषीदिन म्हणून साजरा केला जातो.
स्व. वसंतराव नाईक यांनी अकरा वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा ११ वर्षे सांभाळली़ या काळात रस्ते विकास, वीज निर्मिती, सिंचन प्रकल्पाबरोबरच कृषी क्षेत्रात भरीव योगदान लाभले़ स्व़ वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शेती क्षेत्राला झुकते माप दिले़ शेती आणि शेतकऱ्यांना उर्जित अवस्था आणण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक निर्णय घेतले़ त्यात कुळ कायदा लागू करणे, कसेल त्याची जमीन हे निर्णय महत्त्वपूर्ण ठरले़ विशेष म्हणजे कसेल त्याची जमीन या निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी स्वत:पासून केली़ ते स्वत: जमीनदार शेतकरी होते़ त्यांची स्वत:ची अतिरिक्त जमीन शेतावर राबणाऱ्या शेत मजुरांच्या नावे करून एक वेगळा आदर्श त्यांनी निर्माण केला़ आचार्य विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीला सक्रिय पाठींबा देऊन जमीनदारांकडून हजारो एकर जमीन कष्टकरी, गोरगरीब शेतकऱ्यांना वाटप केल्यामुळे प्रत्यक्ष शेतीवर राबणाऱ्या शेत मजुरांना आत्मसन्मान मिळाला़
स्व़ वसंतराव नाईक यांनी सिंचन प्रकल्प उभारणीबरोबरच नालाबांध, नद्यांवरील छोटे मोठे बंधारे उभारणीचे जाळेच निर्माण केले़ जे वसंत बंधारे म्हणून प्रसिद्ध होते़ ते शेतकऱ्यांना सांगायचे वाटेल त्या मार्गाने शेती भिजविण्यासाठी सिंचनाची व्यवस्था करा, काहीच साधन नसेल तर घाम गाळा आणि घामाने शेती भिजवा, त्यांच्या या वाक्यातून शेती आणि शेतकऱ्यांबद्दलची तळमळ दिसून येते़ वसंतराव नाईक यांच्याच कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये चार कृषी विद्यापीठांची स्थापना झाली़ या विद्यापीठांच्या माध्यमातून कृषी संशोधन व विस्ताराचे कार्य सुरू आहे़
डॉ़अशोक ढवण
संचालक विस्तार शिक्षण वनामकृवि
बागायती
पिकांवर नांगर
विलास चव्हाण, परभणी
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन या पिकांची पाणी देऊन लागवड केली. मात्र तापमानात वाढ झाल्याने ही पिके जळू लागल्याने शेतकऱ्यांनी या पिकावर नांगर फिरविला आहे. यामुळे शेतकरी यंदा देशोधडीला जातो की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गत दोन वर्षापासून जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ६० ते ७० टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली होती. यंदा मात्र शेतकऱ्यांनी मे महिन्यात शेतीची मशागत पूर्ण आटोपली होती. मात्र जूनचा महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ३ टक्के म्हणजेच ९५०० हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली.
यामध्ये शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीन या पिकांना पाणी देऊन पेरले. मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असल्याने ही पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर नांगर फिरविल्याने आता दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. महागामोलाचे बी बियाणे, खत वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
जुलैच्या १५ तारखेपर्यंत पाऊस न पडल्यास जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता बळीराजा पाऊस कधी पडतो यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
निसर्गाचा फटका शेतीला
गतवर्षी अतिवृष्टी व गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रबी ही दोन्ही पिके गेली होती. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला होता. यंदा मात्र जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाने यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी ज्वारीचे अतोनात नुकसान झाल्याने कडबा खराब झाला. शेतकऱ्यांकडे जून व जुलै या दोन महिन्यापुरताच जनावरांचा चारा उपलब्ध आहे. पाऊस न पडल्यास भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कठीण होणार आहे. शेतकऱ्यांना आपली जनावरे मातीमोल भावाने विकण्याची वेळ येऊ शकते.
४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली
परभणी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. जिल्ह्यात येलदरी धरण, मासोळी प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, डिग्रस बंधारा यामुळे जिल्ह्यातील जमिनीचे क्षेत्र काही अंशी सिंचनाखाली आले आहे. परंतु लोकप्रतिनिधी व शासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र म्हणावे तेवढे वाढले नाही. त्यामुळे ६० टक्के कोरडवाहू शेती आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सिंचनाकडे लक्ष दिल्यास अजून २० ते ३० टक्के शेती सिंचनाखाली येऊ शकते. मात्र याचे देणे-घेणे कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील बंधाऱ्याचे काम रखडले
जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणातून सोडण्यात येणारे पाणी अडविण्यासाठी इटोलीजवळ अर्धवट बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुुळे या ठिकाणी पाणी अडविण्याऐवजी सरळ हिंगोली जिल्ह्यात पाणी जात आहे. राजकीय नेत्यांच्या वादामुळे या बंधाऱ्याचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. जिल्ह्यातील पूर्णा, गोदावरी, करपरा, दुधना आदी नद्यांवर बंधारे म्हणावे तसे बांधण्यात आले नाहीत. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र घटले.