समाजकल्याणचा कारभार ‘आॅफ लाईन’च
By Admin | Updated: October 7, 2014 00:16 IST2014-10-06T23:52:27+5:302014-10-07T00:16:36+5:30
बीड : समाजकल्याण विभागात लिपीकाला शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे प्रशिक्षण नसल्याने तर आॅनलाईन सेवेतील सर्व्हर डाऊन झाल्याने शिष्यवृत्ती मिळण्याकरीता आवश्यक असलेल्या

समाजकल्याणचा कारभार ‘आॅफ लाईन’च
बीड : समाजकल्याण विभागात लिपीकाला शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे प्रशिक्षण नसल्याने तर आॅनलाईन सेवेतील सर्व्हर डाऊन झाल्याने शिष्यवृत्ती मिळण्याकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून दुरावत आहे. समाजकल्याण विभागातील आॅनलाईन सेवा ही ‘आॅफ लाईन’ झाली असल्याचे दिसत आहे.
समाजकल्याण विभागाने विहीत नमुन्यात आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. आॅनलाईन प्रक्रियेत सातत्याने बिघाड, तसेच अर्ज स्वीकृत करण्यासाठी विभागामार्फत लिपीकास कोणतेही प्रशिक्षण दिले नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. मागास व बहुजनातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून वेगवेगळे शिष्यवृत्ती विभाग तयार केले आहेत परंतु आॅनलाईन प्रक्रियेत सातत्याने बिघाड होत असल्याने संबंधित अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र इतर जिल्ह्यात ही आॅनलाईन सेवा सुरळीत चालू असल्याचे दिसून येत आहे. मात्र येथील समाजकल्याण विभागातच अधिक त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
या गलथान कारभारामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याचा आरोप शैक्षणिक संघटनांमधून केला जात आहे. आॅनलाईन प्रक्रियेतील बिघाड त्वरीत दुरूस्त करून विद्यार्थ्यांना अद्यावत सेवा उपलब्ध करून द्याव्यात तसेच विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी समाजकल्याणने घ्यावी अशी मागणी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
यासंबंधी त्वरीत दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविसिंह शिंदे यांनी दिला आहे.
आॅनलाईन प्रक्रियेत जिल्ह्यातील काही आठ ते दहा महाविद्यालयांचा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. या महाविद्यालांची माहिती घेऊन पुणे येथील आयुक्त कार्यालयात दाखल केली आहे. तरी आठ दिवसाच्या आत ही सेवा पूर्ववत अथवा दुसरी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त आर.एन.शिंदे यांनी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)