रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणीत मिळतात फक्त सूचना, आश्वासने
By Admin | Updated: June 25, 2014 01:26 IST2014-06-25T01:06:53+5:302014-06-25T01:26:53+5:30
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच मॉडेल रेल्वेस्थानक आणि परिसर चकाचक होतो.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणीत मिळतात फक्त सूचना, आश्वासने
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी येणार असल्याची माहिती मिळताच मॉडेल रेल्वेस्थानक आणि परिसर चकाचक होतो. अधिकारी येतात, पाहणी करतात. स्थानकावरील अधिकाऱ्यांना विविध सूचना देतात आणि विविध सोयी-सुविधा पुरविण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, लवकरच प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती देऊन निघून जात असल्याची स्थिती गेल्या दोन महिन्यांत दिसून आली. अशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात केवळ सूचना, आश्वासने मिळत असताना स्थानिक अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ होताना दिसून आली.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात कॅन्टीन, वेटिंग रूम, स्वच्छतागृह, तिकीट सेक्शन, आरक्षण कार्यालय, सीसीटीव्ही रूम, मालधक्का परिसराची पाहणी क रण्यात आली.
रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, मेटल डिटेक्टर बंद आहेत, मालधक्क्याची जागा अपुरी पडत आहे, अनेक वर्षे रखडत, रखडत पूर्ण झालेल्या लिफ्टच्या सुविधेत लिफ्टमनअभावी अडचणी येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते; परंतु या प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक होईल, यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याचे दिसते. या प्रश्नांची लवकरच सोडवणूक होईल, निधीची अडचण आहे, अशीच काहीशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळते. फक्त चकाचक प्लॅटफॉर्म, परिसरासह प्लॅटफॉर्मवर कधीही न दिसणारी शोभिवंत झाडे अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान दिसून येतात.
पाहणी करण्यावरच भर
९ जून रोजी दक्षिण मध्य रेल्वे एडीआरएम पी.बी. निनावे यांनी रेल्वेस्थानकावरील कॅन्टीससह सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी मॉडेल रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरू होणार असून, १४.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेले हे काम इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (आयटीडीसी) सहकार्याने केले जाणार असल्याची माहिती दिली.
७ मे, १८ जून, २२ जून रोजी नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा यांनी विविध सोयी-सुविधा, स्वच्छतेची पाहणी केली.
अनेक प्रस्ताव रखडले
नव्या इमारतीत, आरक्षण कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. तपासणीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून केवळ देवदर्शन केले जाते. सिकंदराबाद मुख्यालयात अनेक प्रस्ताव पडून आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत अशा अनेक बाबींचा उलगडा झाल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी म्हटले.
रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा
घोषित केलेल्या रेल्वेगाड्या कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करावी लागत आहे. अधिकाऱ्यांकडून केली जाणारी पाहणी ही आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते, असे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा
२० एप्रिल- दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक पी.के. श्रीवास्तव यांचे विंडो ट्रॅक इन्स्पेक्शन.
७ मे- नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा.
५ जून- दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी.बी. निनावे.
९ जून- दक्षिण मध्य रेल्वेचे एडीआरएम पी.बी. निनावे.
१८ जून- नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा.
२२ जून- नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पी.सी. शर्मा.