चार पालिकांत केवळ औपचारिकता बाकी
By Admin | Updated: July 12, 2014 01:16 IST2014-07-12T00:22:04+5:302014-07-12T01:16:17+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर परिषदांमधील नगराध्यक्षांच्या निवड प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरूवात झाली. यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले

चार पालिकांत केवळ औपचारिकता बाकी
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर परिषदांमधील नगराध्यक्षांच्या निवड प्रक्रियेस शुक्रवारपासून सुरूवात झाली. यासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, परंडा, मुरूम, तुळजापूर व कळंब या नगर परिषदांमध्ये केवळ एकाच उमेदवाराचे अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी केवळ अधिकृत निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. तर उस्मानाबादसह भूम, नळदुर्ग आणि उमरगा नगर परिषदेत मात्र एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे ठराविक मुदतीत इतर उमेदवारांनी अर्ज मागे नाही घेतल्यास या ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
उमरगा भाजपाही राहिली तटस्थ
उमरगा : नगर पालिकेच्या नूतन नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या दोन महिला उमेदवारासह भाजप व काँग्रेसच्या एका महिला सदस्यांने नामनिर्देशन पत्र मुख्याधिकाऱ्यांकडे दाखल केले.
शुक्रवारी ११ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांच्याकडे चार महिला सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने शिवसेनेच्या नगरसेविका केवलबाई औरादे, सुनीता सगर, भाजपच्या नगरसेविका राजश्री कोथळीकर व काँग्रेसच्या नगरसेविका प्रेमलता टोपगे या चार सदस्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. शिवसेनेत केवलबाई औरादे व सुनीता सगर यांच्यात चुरस असून, दोघींनीही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डींग लावल्याचे समजते. दरम्यान शिवसेनेचे संख्याबळ जास्त असले तरी भाजपाने यावेळी कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष आपलाच झाला पाहिजे अशी भूमिका घेतल्याने महायुतीत रस्सीखेच वाढली आहे.
दरम्यान सेनेकडून नामनिर्देशनपत्र भरतेवेळी केबलबाई औरादे, सुनीता सगर, राजश्री कोथळीकर, जितेंद्र शिंदे, रज्जाक अत्तार, बाबूराव शहापूरे, कैलास शिंदे, धनंजय मुसांडे, बळी पवार, बालाजी सुरवसे, सुनील कुलकर्णी, दत्तू कटकधोंड तर काँग्रेसचे नामनिर्देशनपत्र भरताना नगरसेविका प्रेमलता टोपगे, नगरसेवक अतिक मुन्शी, सतीश सुरवसे, विजय दळगडे उपस्थित होते. (वार्ताहर)
काँग्रेस-राकाँकडून नळदुर्ग येथे अर्ज
नळदुर्ग : १७ जुलै रोजी होणाऱ्या नळदुर्ग नगर परिषदेतील नगराध्यक्षाच्या निवडीकरिता काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने अर्ज दाखल केल्याने राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे.
काँग्रेसकडून मंगलताई सुरवसे यांनी दोन अर्ज भरले आहेत. सूचक शहबाज काझी, सय्यद सावकार तर अनुमोदक म्हणून सुप्रिया पुराणिक, अपर्णा बेडगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुफीया कुरेशी यांनी अर्ज भरला असून, त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून नय्यरपाशा जहागीरदार, निर्मला गायकवाड, अनुमोदक म्हणून संजय बताले व सुळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
नळदुर्ग पालिकेचे अध्यक्ष शहबाजी काजी तर उपाध्यक्षपदी अपर्णा बेडगे आहेत. काँग्रेसचे नऊ नगरसेवक, राष्ट्रवादीचे पाच, शिवसेना एक, अपक्ष एक असे संख्याबळ असून, राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचे नुकतेच निधन झाले आहे. अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे सहा तर काँग्रेसचे नऊ व एक शिवसेना असे पक्षीय बलाबल असताना राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी दंड थोपटल्याने कोण फुटणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी ए. एल. काटकर तर सहायक निवडणूक अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार एल. एफ. घोशीकर तर त्यांना कार्यालयीन अधीक्षक कस्तुरे सहकार्य करीत आहेत. (वार्ताहर)
राष्ट्रवादीसह काँग्रेस, सेनाही रिंगणात
उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. यावेळी हे पद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने इच्छुकांची संख्याही जास्त होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे सुनील काकडे यांच्यासोबतच काँग्रेसचे नादेरुल्ला हुसेनी व शिवसेनेच्या प्रेमा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे २३, काँग्रेसचे ५ आणि शिवसेनेचे ४ असे पक्षीय बलाबल आहे. यावेळी नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्याने अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून होते. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नंदू राजेनिंबाळकर, सुनील काकडे आणि संपत डोके यांची नावे आघाडीवर होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांची राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेतली. त्यानंतर सुनील काकडे यांच्या नावावर एकमत झाले. काकडे यांनी नगरसेवक अमित शिंदे, अभय इंगळे, रोहित निंबाळकर, दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या वतीनेही नादेरुल्ला हुसेनी तर शिवसेनेच्या वतीने प्रेमा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १६ जुलै आहे. पालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ २३ इतके आहे. तर काँग्रेस ५ आणि सेनेचे ४ नगरसेवक आहेत. एकूण संख्याबळाचा विचार केला असता, नगराध्यक्षपदी काकडे यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. (प्रतिनिधी)
भूममध्ये दोघांचे
चार अर्ज
भूम : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या भूम नगर पालिकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले़ दरम्यान आघाडीकडून फातेमाबी इकबालखाँ पठाण यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नगर परिषद सभागृहात शुक्रवारी सकाळी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयोगिता गाढवे यांचे दोन तर आघाडीच्या फातेमाबी इकबालखाँ पठाण यांचे दोन असे चार उमेदवारी अर्ज दाखल झाले़ छाननीनंतर ते दोन्ही वैध ठरल्याचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी सांगितले़ संयोगिता गाढवे यांचा अर्ज गटनेता संजय गाढवे यांनी दाखल केला़ त्यावेळी नगरसेवक श्रीराम मुळे, महादेव गायकवाड, तोफिक कुरेशी, गौरीशंकर साठे, बाळासाहेब गवळी, विलास रोकडे आदी उपस्थित होते़ तर आघाडीच्या फातेमाबी इकबाल खाँ पठाण यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले़ त्यावेळी नगरसेवक रूपेश शेंडगे, गणेश शेंडगे आदी उपस्थित होते़ १७ जुलै रोजी नगराध्यक्षपदासाठी निवड होत आहे़ भूम नगर पालिकेत राष्ट्रवादीचे १२ तर आघाडीचे ४, मनसेचा एक असे १७ नगरसेवक आहेत़ यापूर्वी राष्ट्रवादीच्या जिजाबाई रोकडे यांनी अध्यक्षपदाची धुरा संभाळली आहे़
कळंबमध्ये काँग्रेसचा राजकीय ‘गेम’ हुकला
कळंब : शिवसेनेची हतबलता राष्ट्रवादीची उदासीनता यामुळे कळंब न.प. च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस (आय) चा राजकीय गेम हुकला. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मिराताई भागवत चोंदे यांचाच एकमेव अर्ज आल्याने १७ जुलै नगराध्यक्षपदी त्यांचीच वर्णी लागणार आहे.
कळंब नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, सेना व काँग्रेसमधील नाराज नगरसेवक अशी आघाडीची तयारी झाली होती. यासाठी या सर्वांनी येडशी येथे झालेल्या बैठकीत फॉर्म्युलाही तयार केला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्यात काँग्रेसचे सहकार्य आवश्यक असल्याने सेनेचे नगरसेवक पांडूरंग कुंभार व किर्ती अंबुरे यांना राष्ट्रवादीसोबत जाण्यास आ. ओम राजेनिंबाळकरांनी अटकाव केला. त्यामुळे कुंभार व अंबुरे यांनी काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
न.प.मध्ये काँग्रेसचा विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही विरोधकांची मोट बांधण्यास उदासिनता दाखविली. काँग्रेसचे तीन नगरसेवक बाजूला सरकण्याच्या तयारीत असतानाही त्यांना मॅनेज करण्यास राष्ट्रवादीने पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी, सेना व काँग्रेसचे नाराज अशी आघाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत होऊ शकली नाही. यामुळे मात्र काँग्रेसचे धोक्यात आलेले नगराध्यक्षपद वाचले आहे.
राष्ट्रवादी व सेनेने नगराध्यक्षपदासाठी साधा उमेदवारी अर्जही दाखल केला नाही. काँग्रेसच्या वतीने नगरसेविका मिराताई भागवत चोंदे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पदासाठी फक्त चोंदे यांचाच अर्ज दाखल झाल्याने
१७ जुलै रोजी त्यांच्या बिनविरोध निवडीचीच औपचारिकता बाकी राहिली आहे. (वार्ताहर)
परंडा पालिकेत शिंदे यांना पुन्हा संधी
परंडा : परंडा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विद्यमान नगराध्यक्षा राजश्री शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिली आहे. १७ जुलै रोजी राजश्री शिंदे यांच्या निवडीची घोषणा होणार आहे.
या पालिकेतील सर्वसाधारण जागेवर गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असलेल्या नगराध्यक्षा राजश्री शिंदे यांच्या जागेवर आता आदिका पालके यांना संधी मिळणार अशी चर्चा शुक्रवारी सकाळपासून सुरू होती. मात्र दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र सादर होईपर्यंत नगराध्यक्षा शिंदे यांचेच दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले. यामुळे रिपाइंचे प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या पत्नी आदिका पालके स्पर्धेतून बाहेर पडल्या.
गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे पालिका गटनेते जाकीर सौदागर यांनी नगरसेवक विनोद साळवे यांचा राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत राजकीय लॉबींग सुरू केली होती. मात्र राष्ट्रवादीकडून आज साळवे यांचा अर्ज दाखल न झाल्याने पुन्हा राजश्री शिंदे याच नगराध्यक्षपदी विराजमान होतील. शिंदे यांच्या अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत शिवसेना शहर उपप्रमुख सुभाष शिंदे, उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी नगराध्यक्ष मुकुल देशमुख, संजयकुमार बनसोडे, बाळासाहेब माळी, सतीश मेहेर, संजय कदम आदींची उपस्थिती होती.
तुळजापुरात केवळ कंदले यांचाच अर्ज
तुळजापूर : माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशानुसार नगर परिषद अध्यक्ष पदासाठी नगरसेविका जयश्री विजय कंदले यांचाच अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
नगराध्यक्षपद हे इमाव प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. याकरिता जयश्री कंदले, अॅड. मंजुषा मगर, स्वाती लोंढे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शुक्रवारी सकाळी ९ वाजता आ. राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली. यावेळी सर्वानुमते जयश्री कंदले यांच्या नावावर एकमत झाले.
यानंतर आ. पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज करण्याची सूचना कंदले यांना केली. त्यानंतर कंदले यांनी नगरसेवक पंडित जगदाळे, विद्याताई गंगणे, अर्चना गंगणे, दयानंद हिबारे, गटनेते नारायण गवळी यांच्या सूचक व अनुमोदकसह तीन अर्ज दाखल केले. यावेळी नगरसेवक अजित परमेश्वर, राजेश शिंदे, गटनेते नारायण गवळी, स्वाती कदम, माजी नगराध्यक्ष विद्याताई गंगणे, अर्चना गंगणे, विजय कंदले,
दिलीप गंगणे, प्रकाश मगर आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)
मंगरूळे यांची निवड निश्चित
मुरूम : काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या मुरूम पालिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे यांचा एकमेव अर्ज आला आहे़ त्यामुळे मंगरूळे यांची बिनविरोध निवड निश्चित आहे़ पिठासन अधिकारी श्रीरंग तांबे, नायब तहसीलदार संजय जोशी यांच्याकडे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले़ यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, प्रमोद कुलकर्णी, रशीद शेख, नगरसेवक पाटील, नगराध्यक्ष प्रदीप दिंडेगावे, महारूद्र चवळे, पाशा जेवळे, सिद्राम बालकुंदे, काकासाहेब पाटील, हणमंतराव चिलोबा उपस्थित होते़ (वार्ताहर)