१०७ गावांना केवळ ५ पर्जन्यमापक यंत्रे
By Admin | Updated: September 23, 2014 01:36 IST2014-09-23T00:32:17+5:302014-09-23T01:36:23+5:30
मांडवा : परळी तालुक्यातील १०७ गावांच्या पर्जन्याची नोंद केवळ पाच मंडळांवर केली जात आहे. ही नोंद संपूर्ण मंडळाची नोंद समजली जाते.

१०७ गावांना केवळ ५ पर्जन्यमापक यंत्रे
मांडवा : परळी तालुक्यातील १०७ गावांच्या पर्जन्याची नोंद केवळ पाच मंडळांवर केली जात आहे. ही नोंद संपूर्ण मंडळाची नोंद समजली जाते. यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास व योग्य पर्जन्यमाप मिळत नसल्याने शेतातील पिकांच्या नियोजनास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
परळी तालुक्यातील १०७ गावांचा समावेश होतो. त्यासाठी पाच महसूल मंडळे आहेत. या पाच महसूल मंडळात १०७ गावांची विभागणी करण्यात आलेली आहे.
परळी तालुक्यात कधी गारपीट तर कधी निसर्गाच्या लहरीपणाला येथील लोकांना सामोरे जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस होत नाही. काही गावात पाऊस पडतो तर काही गावांमध्ये पाऊस हुलकावणी देत असल्याचेही समोर आले आहे.
मंडळाच्या एखाद्या गावात कमी- जास्त पाऊस झाला . तसेच एखाद्या गावात पाऊस झालाच नाही तरी पण त्या मंडळाची आलेली पावसाची सरासरी त्या गावांसाठी गृहित धरली जात आहे .
एखाद्या गावात कमी पाऊस असला तरी त्याची नोंद ज्या गावात पाऊस झाला आहे त्याच्यासोबत केली जात आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजना व पीक विम्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही.
तालुक्यातील शेतकरीवर्गातून वारंवार गावनिहाय व तलाठी सज्जावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी केली जात आहे. मात्र प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
एका महिन्याच्या आत तलाठी सज्जावर पर्जन्यमापक यंत्रे न बसविल्यावर महसूल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.(वार्ताहर)