२३पैकी फक्त ४ वाळूघाटांचाच लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:02 IST2017-11-16T00:01:53+5:302017-11-16T00:02:01+5:30
जिल्ह्यात २३ वाळूघाटांची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ चार घाटच लिलावात गेले आहेत. उर्वरित घाटांसाठी पुन्हा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

२३पैकी फक्त ४ वाळूघाटांचाच लिलाव
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात २३ वाळूघाटांची आॅनलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्यापैकी केवळ चार घाटच लिलावात गेले आहेत. उर्वरित घाटांसाठी पुन्हा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वाळूघाटांची कंत्राटदारांच्या स्पर्धेत किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून आता अनेक घाट त्यांच्याही अवाक्याबाहेर गेले आहेत. यंदाही अशीच स्पर्धा झाली तर घाट बेभाव किमतीत घ्यावे लागतील, असे चित्र होते. मात्र तरीही तीन ते चारपट किमतीत घाट गेले आहेत. यामध्ये डिग्रस त.कोंढूर, कसबे धावंडा, नांदखेडा, पोटा खु. या घाटांचा समावेश आहे. या घाटांमुळे ७३ लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. या चार घाटांची प्राथमिक बोली पूर्ण झाली आहे. दुसºया टप्प्यातही ते कायम राहिल्यास पैसे भरून घेत हे घाट खुले करणे शक्य होणार आहे. मात्र सध्या बेभाव मिळणारी वाळू काही प्रमाणात का होईना कमी दराने मिळणार आहे. या घाटांतही दोन ते अडीच हजार रुपये ब्रासपर्यंत दर पडणार आहेत. काहींचे त्यापेक्षाही जास्त आहेत.
तहसीलदारांनाच अधिकार!
जे घाट लिलावात जाणार नाहीत. अशा ठिकाणावरून वाळू नेण्यासाठी नागरिकांना थेट तहसील कार्यालयात रॉयल्टी भरून वाळू नेण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे. असे झाल्यास नागरिकांना भाड्याने वाहन लावून वाळू आणावी लागेल. मात्र थेट पैसे भरून वाळू आणल्याने गरजेच्या वेळी वाळूचा कंत्राटदार शोधत बसण्याची गरज राहणार नाही. शिवाय अनेक घाट न गेल्यामुळे या व्यवसायातील वाहनांचा आता खाजगी लोकांना भाड्याने उपयोग करून घेणेही शक्य होणार आहे. यात केवळ नफेखोरीने या व्यवसायात उतरलेल्यांना मात्र फटका बसू शकतो.