दीड हजार एकरात केवळ दीडशे उद्योग
By Admin | Updated: July 22, 2014 00:16 IST2014-07-21T23:56:39+5:302014-07-22T00:16:58+5:30
उस्मानाबाद : कुसळी डोंगराच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवर उद्योगांना भरभराट मिळालीच नाही!

दीड हजार एकरात केवळ दीडशे उद्योग
उस्मानाबाद : कुसळी डोंगराच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवर उद्योगांना भरभराट मिळालीच नाही! परिणामी जिल्ह्यातील हजारो युवक रोजगाराच्या शोधार्थ पुणे, मुंबईसह इतर शहरात जात आहेत़ बोटावर मोजण्याइतके उद्योजक वगळता अनेकांनी कारखान्यांना टाळे ठोकले आहे़ तर काहींनी कागदोपत्री व्यवसाय दाखवित कामगार निवासस्थानात संसार थाटला आहे़ ‘एमआयडीसी’च्या जिल्ह्यातील तब्बल १४१९.२२५ एकरवर केवळ १५६ उद्योग सुरू आहेत़ त्याही अनेक उद्योग कागदोपत्री सुरू असल्याचे चित्र रंगविण्यात आले आहे़
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने प्रारंभी उस्मानाबाद शहरानजीक १०१़९६ हेक्टर जागा संपादित करून उद्योजकांना व्यवसाय उभारणीची हाक दिली़ त्यानंतर अति़उस्मानाबाद म्हणून नजीकच ५५़५२ हेक्टरवर, उमरगा येथे २१०़५ हेक्टरवर, कळंब येथे १०़१९ हेक्टरवर, भूम येथे १५़५४ हेक्टरवर तर कौडगाव येथे १७३़६३ हेक्टवर औद्योगिक, व्यापारासाठी जागा संपादीत केली आहे़ यातील एकूण ७३३ पैकी ६४९ भूखंड वाटप करण्यात आले आहेत़ यापैकी केवळ १५६ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे ‘एमआयडीसी’च्या कागदावर नमूद करण्यात आले आहे़ वास्तविक पाहता यातील अनेकांनी कागदोपत्री व्यवसाय दाखवित स्वत:चे घर बनविले आहे़ एखाद्या उद्योगाचे काही यंत्र कुजलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले आहेत़ १७९ जणांचे बांधकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे़ तर तब्बल ३२६ जणांना अद्याप बांधकाम सुरू करण्याचा मुहूर्त सापडला नसल्याचे दिसत आहे़ उस्मानाबाद येथील एमआयडीसी परिसर वगळता इतर ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे़ मुलभूत सुविधांसह जागा घेतलेल्या अनेक उद्योजकांच्या कुचकामी मानसिकतेमुळे ‘एमआयडीसी’चा परिसर आज भग्नावस्थेत आहे़
‘डी प्लस’मुळे अनेकांना अभय
उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ क्षेत्र हे महामंडळाच्या ‘डी प्लस’ झोनमध्ये येते़ त्यामुळे येथे उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना सवलती देण्यात येतात़ सवलती देण्यामागे उद्योग सुरू व्हावेत, हा हेतू आहे़ मात्र, अनेकांनी या हेतूला हरताळ फासत बांधकामासह इतर प्रक्रियांना मुदतवाढ घेत ‘डीप्लस’ झोनचेच अभय मिळविले आहे़ त्यामुळे रखडलेली व मुहूर्त न मिळालेली बांधकामे सुरू होणार केव्हा आणि त्या भूखंडावर उद्योग उभारणार केव्हा हा प्रश्न कायम आहे़
केवळ कागदोपत्री घोडेबाजार
उद्योग सुरू करण्याच्या नावाखाली अनेकांनी ‘एमआयडीसी’तील भूखंड मिळविले आहेत़ मात्र, त्या भूखंडावरील उद्योग अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत़ अनेकांनी कागदोपत्री घोडे नाचवित भूखंडावर अलिशान घरे बांधली आहेत़ उस्मानाबाद येथील एमआयडीसीत दोन निवासी भूखंड अधोरेखित करून वाटपही करण्यात आले आहेत़ मात्र, त्यावर बांधकाम सुरू केले नसल्याचे एमआयडीसी सांगते़ प्रत्यक्षात येथे अनेकांनी घरे बांधल्याचे चित्र आहे़
उमरगा येथे बिकट परिस्थिती
‘एमआयडीसी’चे जिल्ह्यात सर्वाधिक २१०़५ हेक्टर क्षेत्र उमरगा येथे आहे़ यातील आरेखित केलेल्या ३४९ भूखंडापैकी ३०० भूखंड वाटप करण्यात आले आहेत़ मात्र येथे केवळ २८ उद्योग सुरू असल्याचे ‘एमआयडीसी’चा कागद सांगतो़ वास्तविक इथेही मोजकेच उद्योग यशस्वीरीत्या सुरू आहेत़ १७० जणांना अद्याप बांधकाम सुरू करण्याचाच मुहूर्त मिळालेला नाही़ तर ९० जणांचे भूखंडावर बांधकाम सुरू असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येते़
आॅनलाईन नोंदणी बंद
‘एमआयडीसी’च्या भूखंडावर एखादा उद्योग सुरू करावयाचा असल्यास तो आॅनलाईन पध्दतीने महामंडळाकडे करण्यात येत होता़ मात्र, दोन वर्षांपासून ही आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया बंद आहे़ त्यामुळे नवीन उद्योजकांची हेळसांड सुरू असून, भूखंड मिळतो की नाही, ही भीती अनेकांना आहे़ शिवाय मुंबई वाऱ्या करूनही हाती काहीच लागत नसल्याची खंत नवीन उद्योजक व्यक्त करताना दिसतात़ त्यामुळे ही आॅनलाईन नोंदणी सुरू होणे गरजेचे आहे़
दिवसाही पथदिवे सुरू
एमआयडीसी विभागातील जवळपास ७ किलोमीटरच्या रस्त्यावर २०० पथदिवे बसविण्यात आले आहेत़ यातील अनेक पथदिवे बंद अवस्थेत असून, अनेक ठिकाणावरील बल्ब गायब आहेत़ तर बहुतांश पथदिवे दिवसाही सुरू असतात़ शनिवारी दुपारीही हा प्रकार एमआयडीसीच्या रस्त्यावर दिसून आला़ टेस्टिंगच्या नावाखाली सर्वच पथदिवे सुरू ठेवण्यात येत असल्याचेही अनेकांनी सांगितले़ तर बहुतांश वेळा पथदिवे बंद करण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येते़
मोजकेच उद्योजक यशस्वी
जिल्ह्यातील एमआयडीसीचे क्षेत्र मोठे असले तरी काही मोजकेच उद्योजक यशस्वी ठरले आहेत़ त्या उद्योगांमुळे जवळपास ९०० ते १००० कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे़ उत्पादित केलेल्या मालाची बाजारपेठेत योग्य पध्दतीने मार्केटींग केल्याने हे उद्योजक तग धरून आहेत़ मात्र, इतर उद्योजकांच्या भूखंडावरील बांधकाम रखडले आहे़ तर अनेकांचे बांधकामाबाबतचे भिजत घोंगडे कायम असल्याचे चित्र आहे़